परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:07 PM2024-09-26T20:07:45+5:302024-09-26T20:09:06+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या रूपात तिसरी आघाडी आकारास येत आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षासह राज्यातील अनेक छोटेमोठे पक्ष सहभागी झाले आहे. दरम्यान, परिवर्तन महाशक्ती आघाडीतील घटक पक्षांचे नेते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत. कालच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे बच्चू कडू यांचा समावेश आहे.
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही राज्यातील २८८ जागांवर उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. आता या भेटीगाठींमुळे मनोज जरांगे पाटील हे परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांना पाठिंब्याबाबत काही निर्णय घेतात का पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.