नेत्यांनो, शांतता... कोर्ट चालू आहे!
By admin | Published: November 27, 2015 03:12 AM2015-11-27T03:12:02+5:302015-11-27T03:12:02+5:30
सभागृहात हमरीतुमरीवर येऊन गोंधळ घालण्याची ‘संस्कृती’ ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र दिसत असली, तरी अशा गोंधळाची थेट न्यायालयाने दखल घेऊन, पोलिसांकरवी समज देण्याची घटना पाटणमध्ये घडली.
सातारा : सभागृहात हमरीतुमरीवर येऊन गोंधळ घालण्याची ‘संस्कृती’ ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र दिसत असली, तरी अशा गोंधळाची थेट न्यायालयाने दखल घेऊन, पोलिसांकरवी समज देण्याची घटना पाटणमध्ये घडली.
पंचायत समितीच्या मासिक सभेत आमदार शंभूराज देसाई आणि माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या समर्थक गटांत प्रचंड शाब्दिक चकमक, आरडाओरडा, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न असे प्रकार सुरू होते. पोलिसांना बोलवावे लागेल की काय, अशी चिन्हे असतानाच, प्रत्यक्षात पोलीसच सभागृहात आले. त्यांना पाटण न्यायालयाने पाठविलेले होते, तेही ‘शेजारीच न्यायालयाचे कामकाज सुरू असून, सभापती आणि सभागृहाला समज द्यावी,’ असा आदेश घेऊनच!
न्यायालयाची इमारत पंचायत समिती परिसरालगतच आहे. सभागृह दुसऱ्या मजल्यावर आहे. तिथे देसाई-पाटणकर गटांत चाललेल्या वादावादीचा आवाज थेट न्यायालयात पोहोचत होता. अखेर न्यायाधीशांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांना पंचायत समितीच्या सभागृहात पाठविले. सभागृहातील आरडाओरड्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा येत आहे, याची कल्पना गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांना दिली. त्यानंतर सभापती, उपसभापती, सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांमार्फत ही बाब सर्वांपर्यंत पोहोचली आणि वातावरण शांत झाले. (प्रतिनिधी)