पोेस्टाच्या तिकिटांवर येणार संघाचे नेते
By admin | Published: August 3, 2015 01:53 AM2015-08-03T01:53:03+5:302015-08-03T01:53:03+5:30
नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपली वैचारिक बैठक टपाल तिकिटांमधूनही प्रतिबिंबित करण्याचे ठरविले असून, टपाल तिकिटांवरील इंदिरा
नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपली वैचारिक बैठक टपाल तिकिटांमधूनही प्रतिबिंबित करण्याचे ठरविले असून, टपाल तिकिटांवरील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या चित्रांची सद्दी संपवून त्याऐवजी श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पं. दीन दयाळ उपाध्याय या संघनेत्यांसह इतर देशभक्तांना स्थान देण्याची तयारी सुरू केली आहे.
टपाल खाते ‘कोमेमोरेटिव्ह’ व ‘डेफिनिटिव्ह’ अशा दोन प्रकारची तिकिटे काढत असते. ‘कोमेमोरेटिव्ह’ तिकिटे खास प्रसंगी काढले जातात व त्यांचे वितरण मर्यादित असते. ‘डेफिनिटिव्ह’ तिकिटे ही दैनंदिन वापरासाठी काढली जातात. स्वातंत्र्यापासून काढण्यात आलेल्या दैनंदिन वापराच्या तिकिटांमध्ये इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या तिकिटांचे प्राबल्य दिसून येते. ते असंतुलन दूर करण्याचे नवे धोरण असल्याचे दळणवळणमंत्री रवीशंकर प्रसाद यांचे म्हणणे आहे.
महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची चित्रे असलेल्या दैनंदिन वापराच्या टपाल तिकिटांचे वितरण यापुढेही सुरू राहणार असले तरी इंदिरा व राजीव गांधी यांच्या तिकिटांची नव्याने छपाई बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, संघनेते दीन दयाळ उपाध्याय व श्यामा प्रसाद मुखर्जी, राम मनोहर लोहिया, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगत सिंग, सुभाष चंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर व सुब्रह्मण्यम् भारती यांच्या चित्रांची दैनंदिन वापराची टपाल तिकिटे काढण्यात येणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार असे करून ‘ऐतिहासिक चूक’ सुधारण्यात येणार आहे. तसेच पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान व एम.एस. सुब्बलक्ष्मी या संगीतरत्नांवर तिकिटे काढण्याचा सरकारचा विचार आहे