नेत्यांच्या घरून काम चालणार नाही; भाजपची लोकसभा निवडणूक रणनीती ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:05 PM2024-01-02T13:05:54+5:302024-01-02T13:06:11+5:30
लोकसभा निवडणुकीसाठीच्या सर्व हालचाली या पक्ष कार्यालयातून होतील. कोणत्याही नेत्याच्या घरून काम होणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी बजावले आहे.
मुंबई : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपचे जनसंपर्क कार्यालय ३० जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुरू केले जाईल. लोकसभा निवडणुकीसाठीच्या सर्व हालचाली या पक्ष कार्यालयातून होतील. कोणत्याही नेत्याच्या घरून काम होणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी बजावले आहे.
येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोशल मीडियाच्या वापरात भाजपचे नेते, कार्यकर्ता आणि एकूणच यंत्रणा कशी कमी पडत आहे यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. अपेक्षेपेक्षा केवळ आठ टक्केच काम होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपपासून सर्व प्लॅटफॉर्मवर धडाक्यात काम सुरू करा, असे आदेश देण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियावर शंखनाद करा असे सांगण्यात आले.
नवमतदारांची संमेलने
- युवा मोर्चासह भाजपच्या राज्यात सात प्रमुख आघाड्या आहेत. या प्रत्येक आघाडीतर्फे किमान २५ हजार लोकांच्या उपस्थितीत दोन मेळावे घेण्यात येणार आहेत. या शिवाय नवमतदारांची संमेलने घेण्यात येतील. अल्पसंख्याक मतदारांमध्ये जा, असे आदेशही देण्यात आले आहेत.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्प यात्रा जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे.