विधान परिषदेसाठी आघाडी
By Admin | Published: January 17, 2017 04:58 AM2017-01-17T04:58:11+5:302017-01-17T04:58:11+5:30
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली असून काँग्रेस तीन, राष्ट्रवादी एक तर कोकणची जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आली.
दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा व विधान परिषद निवडणुकांबाबत चर्चा करण्यास टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याच्या उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक २४ आणि २५ जानेवारी रोजी मुंबईत होणार असून, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची निवड ३० आणि ३१ जानेवारी रोजी होईल. महानरपालिका निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी २७ आणि २८ जानेवारी रोजी बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले की, नाशिक व अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ या तीन जागा काँग्रेस पक्ष लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे. कोकण शिक्षण मतदारसंघात दोन्ही पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत.
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, एमआयएम या जातीयवादी पक्षांना वगळून इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, आघाडी करण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्षांसह महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, आदी नेते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
>महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, एमआयएम या जातीयवादी पक्षांना वगळून इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष