नेतृत्व, राजकारण, प्रशासनाचाही धडा गिरवता येणार!
By admin | Published: June 1, 2017 03:49 AM2017-06-01T03:49:46+5:302017-06-01T03:49:46+5:30
समाजात नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. पण, ‘नेतृत्वशास्त्र’ हा विषय अभ्यासक्रमात शिकवला जात नाही. मॅनेजमेंट अभ्यासक्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजात नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. पण, ‘नेतृत्वशास्त्र’ हा विषय अभ्यासक्रमात शिकवला जात नाही. मॅनेजमेंट अभ्यासक्रमात शिकवले जाणारे नेतृत्व हे फक्त मर्यादित स्वरूपाचे असते. त्यामुळे राजकारण, प्रशासन आणि
नेतृत्व यांचा एकत्रित अभ्यासक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुढाकाराने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ डेमोक्रॅटिक लीडरशिपतर्फे १ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा बुधवारी
इंडियन मर्चंट चेंबर्स येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे, लेखक अमीष त्रिपाठी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे आणि प्रा. देवेंद्र पै
उपस्थित होते. या कार्यक्रमात अभ्यासक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि घडीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. १ आॅगस्टपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार असून, ९ महिन्यांचा आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले, राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. पण, या अभ्यासक्रमांमध्ये पुस्तकी ज्ञान अधिक मिळते. प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नाही. चांगले प्रशासन ही संज्ञा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळेच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या अथवा प्रशासनाचे ज्ञान असावे म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी अभ्यासक्रमाचे कौतुक केले. सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर आता मुंबई विद्यापीठातही २३ वर्षांनी निवडणुका होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमाचा नक्कीच समाजाला फायदा होणार आहे.
लेखक त्रिपाठी म्हणाले, प्राचीन काळात भारताची अर्थव्यवस्था, संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जात होती. प्रत्येक क्षेत्रात देश अव्वल होता. पण, गेल्या २०० ते ३०० वर्षांत देशाचे नाव मागे पडत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे
आपण आपल्या पूर्वजांना विसरलो आहोत. इंग्रजांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीचा आपल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडल्यामुळेच आधीचे ज्ञान विस्मरणात गेले आहे. पण, आता नव्याने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमामुळे नक्कीच त्याचा फायदा तरुण पिढीसह समाजालाही होणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओद्वारे दिल्या शुभेच्छा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; पण उपस्थित राहू न शकल्याने व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या. लोकशाहीत नेतृत्वगुणाला महत्त्व आहे.
राजकारण असेही बदनाम आहे. अनेकदा या विषयावर नकारात्मक बोलले जाते. राजकारणी हे चलाखीने बोलतात; पण त्यांना ज्ञान नसते, असा समज करून घेतला आहे; पण आता शैक्षणिक अर्हता पाहिली जाईल. अनेकदा आयएएसनाही काही गोष्टी माहीत नसतात.
त्यामुळे चौकटीबरोबर शासनाचे अंतर्बाह्य ज्ञान मिळेल. पाठ्यक्रम आणि सिद्धान्तांचा अभ्यास होईल. प्रात्यक्षिक ज्ञानाचा नक्कीच फायदा होणार आहे. सुजाण नागरिक निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.