आघाडीची केवळ चर्चाच; अधिकृत प्रस्ताव नाही
By admin | Published: January 24, 2017 10:50 PM2017-01-24T22:50:44+5:302017-01-24T22:50:44+5:30
अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतची घडमोड जाणून घेतली असता आघाडीची चर्चा केवळ भाषणांपुरतीच असून अद्यापपावेतो दोन्ही पक्षांकडून औपचारिक सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी अनुकूल : आज मुंबईत होणाऱ्या बैठकीची प्रतीक्षा
अकोला: राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत आघाडीसाठी काँंग्रेसकडून प्रस्ताव आला असल्याचे सांगत बुधवारी मुंबईत राज्य पातळीवर बैठक बोलावली आहे, अशी माहिती दिली. या माहितीच्या अनुषंगाने अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतची घडमोड जाणून घेतली असता आघाडीची चर्चा केवळ भाषणांपुरतीच असून अद्यापपावेतो दोन्ही पक्षांकडून औपचारिक सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी करीत मोर्चेबांधणी केली आहे. या दरम्यान राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढल्यामुळे या मोर्चेबांधणीचा पुनर्विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. त्याच वेळी आघाडीची चर्चा राज्य पातळीवर सुरू झाल्यामुळे स्वबळाची तयारी करीत असलेल्या राष्ट्रवादीला आघाडीचा राग आळवावा लागला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी केली आहे; मात्र मतविभाजन टाळण्यासाठी आघाडीची भाषा सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी कायम ठेवली होती. भारिप-बमसं या पक्षासोबत आघाडीला काँग्रेसची पसंती होती व राष्ट्रवादीचाही पर्याय खुला ठेवत दिवाळीमध्ये ‘दिवाली मिलन’ भेट घेण्यात आली; मात्र आघाडीची चर्चा पुढे सरकली नाही. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा आघाडीची चर्चा नेत्यांच्या भाषणातून सुरू झाली असली तरी या दोन्ही पक्षांनी अकोल्यात एकमेकांना अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी मुंबई येथे पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत असून या बैठकीमध्ये राज्यातील मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडीबाबत चर्चा होणार आहे त्यामुळे या बैठकीत होणार निर्णय आघाडीची पुढील दिशा स्पष्ट करणारा ठरेल.
-----------
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत फक्त औपचारिक प्रस्ताव किंवा बैठक झालेली नाही. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.
बबनराव चौधरी, महानगर काँग्रेस अध्यक्ष
-----------
प्रदेशाध्यक्षांनी सन्मानजनक आघाडीबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आज मुंबई येथे पार्लमेंटरी बोर्डची बैठक असून या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यावर या संदर्भात पुढे भूमिका स्पष्ट होईल.
विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस