चासकमान डाव्या कालव्याला गळती
By Admin | Published: January 30, 2017 06:00 PM2017-01-30T18:00:32+5:302017-01-30T18:00:32+5:30
चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतेय
ऑनलाइन लोकमत
चासकमान, दि. 30 - चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. अस्तरीकरणाचे काम न झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकरी विचारीत आहेत.
धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर या तालुक्यांना झाला आहे. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते; मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण या कालव्याचे अस्तरीकरणच झालेले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर कालवाफुटीची शक्यता आहे. वेळोवेळी असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तरी शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो.
यादरम्यानच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे परिसरातील अनेक जमिनींत पाणी साचून त्या नापीक झाल्या आहेत. तर काही भागात घरांच्या भिंती सातत्याने ओलसर असतात. यामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच डाव्या कालव्यावर अनेक गावांच्या वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहेत. मात्र ते नादुरुस्त होऊन धोकादायक बनले आहेत.
गरज नसताना सोडले पाणी
या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. रब्बी हंगामात दुसऱ्या आवर्तनाची मागणी नसतानाही पाणी सोडल्याने उन्हाळ्यातील आवर्तनाची मागणी वाढली, तर ते सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणांतर्गत गावांचा उन्हाळ्यातील पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. दुसरे आवर्तन सोडू नये, अशी मागणी खेड तालुक्यातील जनतेने करूनही प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही. आता डाव्या कालव्यातून ५० दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होणार आहे. प्रशासन डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आवर्तनाबाबत निर्णय घेताना विश्वासात घेत नाही. त्यामुळे पाणी नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाला गांभीर्य नाही.
अशोक नाईकरे, सरपंच (कमान)
या भागातील वाड्यावस्त्यांना जोडणारे पूल धोकादायक झाले आहे. या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मागणी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
बाळू राऊत, सरपंच (मोहकल)
अनेक वर्षांपासून माझ्या शेतात येणाऱ्या पाण्यामुळे पिके घेता येत नाहीत. जमीन नापीक झाली आहे. शासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना दुसरीकडे मोलमजुरी करावी लागत आहे.
ज्ञानेश्वर विश्वनाथ नाईकरे, शेतकरी
परिसरातील पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज नसताही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
मारुती सहाने, उपसरपंच (कान्हेवाडी)
आवर्तन सोडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
कैलास मुन्ना नाईकडे, उपसरपंच (कडधे)
पुढील आवर्तन सोडताना चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकर व योग्य नियोजन करून सोडावे.
रितेश मुळूक, सरपंच (आखरवाडी)