पनवेलमधील एलिव्हेटेड ब्रीजला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 01:40 AM2016-07-22T01:40:27+5:302016-07-22T01:40:27+5:30

शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च करून रस्ते विकास महामंडळाकडून बांधलेल्या पनवेल शहरातील एलिव्हेटेड ब्रीजला (उन्नत मार्गाला) गळती लागली

The leakage of the elevated breezce in Panvel | पनवेलमधील एलिव्हेटेड ब्रीजला लागली गळती

पनवेलमधील एलिव्हेटेड ब्रीजला लागली गळती

Next


कळंबोली : शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च करून रस्ते विकास महामंडळाकडून बांधलेल्या पनवेल शहरातील एलिव्हेटेड ब्रीजला (उन्नत मार्गाला) गळती लागली आहे. काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी खाली पडत असल्याने या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक आनंद भंडारी यांनी केली आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून अपघातालाही निमंत्रण मिळत आहे.
शहरातून एनएच-४ जात असून त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी व्हायची. ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी एलिव्हेटेड ब्रीज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला.
२०१३ मध्ये हा मार्ग वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. जवळपास पावणे दोन कि.मी. अंतर असलेल्या या उन्नत मार्गाचे काम जेएमसी या कंपनीला देण्यात आले होते. मात्र सध्या पुलाला मोठी गळती लागली आहे. पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता कडेला पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. परंतु बहुतांशी ठिकाणी ही पाइपलाइन फुटल्याने खाली रस्त्यावर वेगाने पाणी कोसळते. पुलाच्या समांतर असलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
पुलावरून जोरात धबधब्यासारखे पाणी पडत असल्याने खालून जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. कित्येकदा दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्ते विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आनंद भंडारी यांनी केला आहे.

Web Title: The leakage of the elevated breezce in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.