मेट्रो स्टेशनला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2016 01:43 AM2016-08-06T01:43:00+5:302016-08-06T01:43:00+5:30
वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- शुक्रवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता. मेट्रो स्थानक झकास तर अंधेरी वर्सोवा मेट्रोखालील परिसर भकास अशीच अवस्था जणू मेट्रो रेल्वे स्थानकांखालील रस्त्यांची झाली होती. मेट्रोच्या छतातून अनेक ठिकाणी जमिनीवर अभिषेक होत होता. त्यामुळे आधीच खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या येथील रस्त्यांची खूपच दैनावस्था झाली होती.
या मार्गावर इंडियन आॅईल स्थानकाजवळील अंधेरीकडे जाणाऱ्या जयप्रकाश रोडच्या रस्त्यावर तर अंधेरी-कुर्ला मार्गावरील एअरपोर्ट रोड या मेट्रो स्थानकानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच मेट्रो स्थानकांच्या छतांमधून अनेक ठिकाणी वेगाने पाण्याची गळती होऊन त्याचा फटका वाहनांना आणि दुचाकीस्वारांना जास्त बसत होता. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या खालचा परिसर जलमय झाला
होता.
२००६ साली वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात होऊन ८ जून २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या मेट्रोचा शुभारंभ झाला. मात्र मेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे आणि छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे लक्षच दिले नाही.
त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यापासून गेली दोन वर्षे पावसाळ्यात या दोन्ही रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणत पाणी तुंबत असल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केला. या दोन्ही मार्गांवरील रस्त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अंधेरी-कुर्ला मार्गावर वाहतूककोंडी होत असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत असल्याची माहिती त्यांनी दिली.
>अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे तसेच छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्षच दिले नाही.