पालघरच्या पाणी पुरवठ्याला गळती
By admin | Published: January 7, 2017 03:24 AM2017-01-07T03:24:25+5:302017-01-07T03:24:25+5:30
पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण
निखिल मेस्त्री,
नंडोरे (ता. पालघर)- पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण होत चालली असून काही ठिकाणी या वाहिनीला छिद्रे पडून व एअर व्हॉल्व्हच्या जोडणीच्या ठिकाणी भेगा पडून त्यातून गळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचा सांभाळ करणारी नगरपरिषद प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या गळतीवरून स्पष्ट होत आहे.
वाघोबा खिंडीच्या वाघोबा मंदिरापासून समांतर मनोरकडे जाताना उजव्या बाजूस या जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह जोडणीचा पाईप जोडलेल्या ठिकाणी जीर्ण होऊन त्याला भेगा पडून, जलवाहिनीच्या उच्च दाबामुळे यातून पाणीगळती होऊन याठिकाणी पाण्याचे कारंजे बनल्याचे दिसते व रोज या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथून ये जा करणारेही हे पाणी वाया जात असल्याची खंत व्यक्त करतात.
मासवण येथून आणलेले अशुद्ध पाणी या घाट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर शुद्ध पाणी पुरवणारी जलवाहिनी या केंद्राच्या थोड्या पुढे जाऊन तिथेही जलवाहिनीला छिद्रे पडली असून त्यातूनही पाणीगळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसते.ही जलवाहिनी फुटेपर्यंत नगरपरिषद वाट पाहत आहे का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे.
>दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली
पाणी आणणारीं व नेणारी ही जलवाहिनीची योग्य ती चाचणी करून तिची देखभाल व दुरूस्ती करणे अपेक्षित असताना या गंभीर बाबीकडे नगरपरिषद एवढ्या मिहन्यांपासून पार दुर्लक्ष करीत आहे. तसेच एवढ्या उच्च दाबाच्या या जलवाहिनीस अशा गळतीमुळे फुटण्यास वेळही लागणार नाही.
या दुर्लक्षित कारभारामुळे त्यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे नगरपरिषदेने लक्षात घेतलेले बरे.हि होणारी पाणी गळती व त्यातून रोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी याकडे नगरपरिषद यंत्रणेने गाम्भिर्याने लक्ष देऊन हि गळती थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत.
जनतेला पाणी हेच जीवन व पाणी वाचवा असे पाणी बचतीचे धडे प्रशासनामार्फत देण्यात येतात,जनतेला धडे देणाऱ्या या यंत्रणेला पाणीबचतीचे महत्व कोणी शिकवावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.