गळती, चोरी, पाइपफुटीचा फटका

By admin | Published: April 5, 2017 03:27 AM2017-04-05T03:27:06+5:302017-04-05T03:27:06+5:30

वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

Leakage, theft, pipefish | गळती, चोरी, पाइपफुटीचा फटका

गळती, चोरी, पाइपफुटीचा फटका

Next

शशी करपे,
वसई- वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीने उचलला असून टँकरचे दर वधारल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत.
सध्या वसई विरार शहराला सूर्या, उसगाव, पेल्हार आणि पापडखिंड धरणातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होतो. वसईची लोकसंख्या पाहता दररोज आणखी ९० एमएलडीची पाण्याची गरज आहे. हा तुटवडा लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महापालिका एक दिवस आड पाणी पुरवठा करून शहराची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. सूर्याची वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. मात्र, त्यातून प्रत्यक्षात पाणी पुरवठा होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पण, सध्या पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे.
विरार येथील पापडखिंड धरण आटल्याने तेथून होणारा १ एमएलडी पाणी पुरवठा बंद झाला आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटू लागली आहे. त्यातच लोडशेडींगमुळे पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडीत होणे, दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करणे असे प्रकार होत आहेत. १५ मार्चला तीन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाच दिवस लागले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सूर्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा तीन दिवस ठप्प झाला होता.
महत्वाची बाब म्हणजे सूर्या पाणी पुरवठा लाईनवर अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य पाईपलाईनवरून ज्या गावांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत तेथून टँकरचालक पाणी चोरी करीत आहेत. सध्या वसई विरार परिसरात पाणी टंचाईचे जोरदार चटके जाणवू लागले आहेत. त्याचा फायदा उचलून टँकर लॉबीने आपले दर वाढवून लोकांची अडवणूक सुरु केली आहे. संपूर्ण शहरात सध्या साडे सहाशेहून अधिक टँकर धावू लागले आहेत. त्यापैकी एकट्या नालासोपारा परिसरात साडेतीनशेच्या आसपास टँकर आहेत. पाणी टंचाईचे निमित्त पुढे करीत टँकरचे दर दीड हजार रुपयांपर्यंत जाऊन पोचले आहेत.
>जुनाट, गळके, अनफिट टँकरमुळे अपघात वाढले : विरारच्या आरटीओ कार्यालयात फक्त २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे आरटीओ कार्यालयात आहे. ्त्यामुळे शहरात किमान तीनशे टँकर बेकायदेशीरपणे धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुन्या ट्रकवर बंदी आहे. याच ट्रकवर फेरबदल करून टँकरमध्ये बेकायदेशीर रुपांतर करून वापर केला जात आहे. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिक फेऱ्यांच्या नादापायी चालक सुसाट टँकर चालवून महिन्याला किमान एकाच बळी घेत आहेत.
>पाईपलाईन फुटी गुन्हे दाखल करा
काही वर्षांपूर्वीच नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन फुटत असल्याने पाईपलाईनची गुणवत्ता तपासून अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी केली आहे. फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कालावधीत तात्पुरता पाणी पुरवठा करण्याची कोणतीच योजना महापालिकेकडे नाही. त्यामुळे संपूर्ण वर्षाची एकरकमी पाणी पट्टी भरूनही लोकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या संधीचा फायदा घेऊन टँकर लॉबी जादा दर आकारीत असल्याची तक्रार नाईक यांनी केली आहे.

Web Title: Leakage, theft, pipefish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.