पुरंदर उपसा योजनेतून गळती
By admin | Published: April 8, 2017 01:40 AM2017-04-08T01:40:36+5:302017-04-08T01:40:36+5:30
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे
भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याचा भुर्दंड मात्र विकत पाणी घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यामुळे ही गळती थांबवण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केली आहे.
पुरंदर तालुक्याला दुष्काळ पाचविलाच पुजलेला. चौबाजूंनी डोंगररांगा, पाण्याचे कोणतेही साधन नाही. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा जन्म झाला आणि सारी परिस्थितीच बदलून गेली
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
त्याचप्रमाणे यंदाचा उन्हाळी हंगामातील एक एमसीएफटी पाण्यासाठी शासनाचा ५९,००० हजार रुपये इतका दर आहे. कदाचित, काही दिवसांनी हा दर काही प्रमाणात कमीदेखील होण्याची शक्यता आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजना बारमाही सुरू राहणे गरजेचे आहे. उन्हाळी हंगामात पाण्याची मागणी दर वर्षीच वाढते यामुळे शासकीय यंत्रणेवरती ताण येतो. पुरंदर तालुक्यात दोन्ही हंगामांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. गेल्या वर्षी ३५२ मि.मि. पाऊस झाला, तोही फक्त २२ दिवसच. या पावसात नाले, तळी तर सोडाच, साधे ओढ्यातून पाणीदेखील वाहिले नाही. यामुळे याचा बोजा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर वाढतो व पाण्याची मागणी वाढते.
सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. उन्हाळी दर जास्त आहे. यामुळे जेवढे पैसे भरले जातात, तेवढे पाणी मिळणे गरजेचे; मात्र या योजनेच्या एअरव्हॉल्व्हची मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही; उलट गळणाऱ्या पाण्याचा भुर्दंड पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर पडतो. यामुळे पाणी घेणारे शेतकरी नाराजी व्यक्त करतात.
शाखा अभियंता नाही
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले हे मार्च महिनाअखेरीस सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांच्या जागी अद्यापही शाखा अभियंत्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे ही योजना कोण पाहणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गळणारे व्हॉल्व्हचे काय?
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सर्वच व्हॉल्व्ह मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड मात्र लाभार्थी गावातील शेतकऱ्यांना पडतो. यामुळे जास्त दाबाने पाणी मिळत नाही. गळणाऱ्या एअरव्हॉल्व्हचा सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. मात्र, गळणारे एअरव्हॉल्व्ह दुरुस्त होत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करूत आहेत.