विदेशी पर्यटकांचा विदर्भाकडे ओढा
By admin | Published: September 15, 2014 01:02 AM2014-09-15T01:02:01+5:302014-09-15T01:02:01+5:30
विदर्भातील घनदाट जंगल व त्यामधील वन्यप्राणी आता विदेशी पर्यटकांना चांगलेच खुणावू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ५ देशातील २१ विदेशी पर्यटकांनी ताडोबा येथे भेट देऊन,
२१ विदेशी पाहुण्यांची ताडोबात जंगल सफारी : एमटीडीसीतर्फे आयोजन
नागपूर : विदर्भातील घनदाट जंगल व त्यामधील वन्यप्राणी आता विदेशी पर्यटकांना चांगलेच खुणावू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ५ देशातील २१ विदेशी पर्यटकांनी ताडोबा येथे भेट देऊन, येथील जंगल सफारीचा मनसोक्त आनंद लुटला. यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली व स्लोवकिया येथील पर्यटकांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, अलीकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) विदेशी पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात एमटीडीसीचे नागपुरातील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे फार मोलाची भूमिका बजावित आहे. हेडे यांनी विदेशी पर्यटकांसाठी गत १२ व १३ सप्टेंबर अशा दोन दिवसांचा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी या पर्यटकांचा नागपुरातून प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यानंतर ते दुपारी ताडोबा येथे पोहोचले. तेथे एमटीडीसीच्या पर्यटन निवासात त्यांचे पारंपरिक पद्घतीने स्वागत करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमानंतर ताडोबा येथे एमटीडीसीने तयार केलेले इको फ्रेडली कॉटेजेस्, योगा हट व व्हीआयपी सूट दाखविण्यात आले. यानंतर लगेच मोहर्ली गेटवरून जंगलात प्रवेश करून, जंगल सफारी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी (१३ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता वॉकिंग सफारी करण्यात आली. यात विदेशी पर्यटकांनी पक्षी निरीक्षण व जंगल भ्रमंतीचा आनंद घेतल्याची माहिती हेडे यांनी दिली. यावेळी विदेशी पर्यटकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, विदर्भातील पर्यटनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अमेरिकेतील हॅरी डग्गुबॅटी यांनी ताडोबा येथे क्रीडा सफारीसाठी फार मोठा वाव असल्याचे सांगितले. तसेच इटली येथील ल्युडिया चॅपुटो यांनी ताडोबा जंगलात विविध दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (प्रतिनिधी)