कष्ट कमी केल्यास शेतीकडे ओढा : मानकर
By admin | Published: October 13, 2014 10:11 PM2014-10-13T22:11:24+5:302014-10-13T23:04:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर
दापोली : सद्यस्थितीत कोकणात शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब खूपच कमी होत आहे. काही प्रमाणात येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. तथापी शक्य तेथे यांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीमधील कष्ट कमी केल्यास, सुरक्षित अशा यंत्राचा अथवा अवजारांचा वापर केल्यास शेती करण्यामागे कोकणवासीयांचा ओढा वाढेल आणि पर्यायाने आज ओस पडत चाललेल्या शेतीला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोकणातून होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर यांनी व्यक्त केला.
दापोली येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, आज शेती, अवजारे, साधने निर्माण करताना श्रमविज्ञान शास्त्र आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तरीसुद्धा याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचाही विचार केला गेल्यास अधिक प्रमाणात श्रम कमी करणे शक्य होईल. यासाठी लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही डॉ. मानकर यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय श्रमविज्ञान समितीचे अध्यक्ष आणि आय. आय. टी., मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, शेतीसाठी अत्याधुनिक अवजारे, साधने वापरल्यास श्रम कमी होतील. त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असण्यावर भर दिला पाहिजे. आय. आय. टी., मुंबई आणि दापोली कृ षी विद्यापीठाने एकत्रितपणे काम केल्यास निर्माण होणारी अवजारे, साधने अधिक सुकर होतील आणि त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. मानकर यांनी शेतीसाठी वापरावयाची साधने व याबाबतचे नवीन, प्रगत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. लक्ष्मण गीते, कृषियंत्र व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील हिने केले. डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे कुलगुरूंचे आवाहन
यांत्रिकीपध्दतीचा अधिक वापर झाल्यास फायदा
कष्ट कमी केल्यास अधिक उत्पादन
कार्यक्षमता वाढविण्याचा दिला मानकर यांनी सल्ला
कृषी विकासासाटी एकत्रित काम करण्याचे सूतोवाच
नव्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदा