अवकाश संशोधनामध्ये घेतलेली झेप असामान्य
By admin | Published: March 1, 2017 01:07 AM2017-03-01T01:07:57+5:302017-03-01T01:07:57+5:30
अवकाश संशोधनामध्ये आज भारताने घेतलेली झेप असामान्य आहे.
बारामती : अवकाश संशोधनामध्ये आज भारताने घेतलेली झेप असामान्य आहे. अत्यंत कमी पैशात अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळे हे शक्य झाल्याची माहिती विज्ञानविषयक विज्ञान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी दिली.
एन्व्हॉयर्नमेंट फोरम आॅफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इस्त्रोची विक्रमी अवकाश झेप या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभुणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आज जागतिक पातळीवर भारत सर्वोच्च स्थानावर आहे. आपल्या संशोधकांकडून एकाच वेळेस १०४ उपग्रह अतिशय अचूकपणे अवकाशात एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची किमया इस्त्रोने साध्य करुन दाखविली आहे.
भारतीय अवकाश संशोधनाचा स्वातंत्र्यानंतर सुरु झालेला प्रवास प्रभुणे यांनी सविस्तरपणे उलगडून दाखविला. या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आपले अवकाश संशोधनाची प्रगती, अमेरिका व रशियाच्या तुलनेत भारताचा खर्च किती अत्यल्प होता याचेही विवेचन त्यांनी या वेळेस केले.
भारतीय अवकाश संशोधन आजमितीस जागतिक स्तरावर सर्वोच्च आहे, आणि आपण देशांतर्गत सर्व सुटे भाग बनवून हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करतो हेही आपले यश म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अॅड. निलिमा गुजर यांनी प्रभुणे यांचे स्वागत केले.
ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. संगीता काकडे यांनी आभार व्यक्त केले.(वार्ताहर)
>मंगळावर यान पाठविण्याच्या मोहिमेविषयीही त्यांनी या वेळी माहिती दिली. या मोहिमेच्या प्रारंभापासून ते १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणापर्यंतचा प्रवास तसेच भविष्यातील इस्रोचे काही प्रकल्प या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.