‘त्या’ आमदार, खासदारासारखे तुम्हीसुद्धा वागायला शिका; अजितदादाही क्लास घेऊ शकतील
By अतुल कुलकर्णी | Published: September 11, 2022 09:41 AM2022-09-11T09:41:09+5:302022-09-11T09:41:44+5:30
मराठवाड्यातल्या एका आमदाराने अधिकाऱ्याला दमात घेतले., ठेकेदाराच्या गालावर प्रसाद दिला., विदर्भातल्या एका खासदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचीच हजेरी घेतली
प्रिय नेतेमंडळी,
नमस्कार.
आपले ‘गणपर्यटन’ झाले ना..? या निमित्ताने आपापल्या पुन्हा एकदा मतदारांशी संपर्क साधण्याची चालून आलेली संधी आपण सोडली नसेलच. त्यानिमित्ताने त्यांची सुखदुःखंही ऐकली असतीलच. आता सौजन्य सप्ताह संपला आहे. तेव्हा आपण मतदार संघाच्या फेऱ्या कमी करून मंत्रालयाच्या फेऱ्या सुरू करा. तसेही नवीन सरकार आल्यापासून मंत्रालयात हल्ली फारसे मंत्री दिसत नाहीत. जे काही चाळीसएक आमदार आहेत, ते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला दिसतात, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने काही लोकप्रतिनिधींनी आपली वागणूक बदलली आहे, त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.
मराठवाड्यातल्या एका आमदाराने अधिकाऱ्याला दमात घेतले., ठेकेदाराच्या गालावर प्रसाद दिला., विदर्भातल्या एका खासदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचीच हजेरी घेतली... काय ते आमदार...! खोटं बोलला म्हणून ठेकेदाराला त्यांनी जबरदस्त प्रसाद दिला. त्याचा गाल पाहायला चॅनलवाले जमले होते, अशी चर्चा आहे...! काय त्या खासदार..! त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचाच मोबाईल घेऊन डीएसपीच्या काचेवर आदळआपट करत त्या अधिकाऱ्याला जो काही घाम फोडला, त्याला तोड नाही..!! असे नेते असल्याशिवाय अधिकारी सरळ होणार नाहीत. कायदा कायद्याच्या पद्धतीने चालत राहील... मात्र आमदार - खासदारांनी त्यांच्या सोयीने कायद्याचा जो काही अर्थ लावला आहे, त्यामुळे आपला महाराष्ट्र वेगाने उत्तर प्रदेश, बिहारच्याही पुढे निघून जाईल... तो दिवस दूर नाही...! याविषयी आम्हाला तिळमात्र शंका नाही..!
पोलीस अधिकाऱ्याने आपल्या फोनचे रेकॉर्डिंग केले, अशी शंका आल्यानंतर उगाच पोलिसांत तक्रार करा... त्यानंतर चौकशी होणार... कधीतरी प्रकरण कोर्टात जाणार... त्यावर निकाल लागण्यात काही वर्षे जाणार... तोपर्यंत तो अधिकारी कुठे गेला असेल आणि आपल्याकडचे पद राहिले असेल की नसेल, कोणास ठाऊक...? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एवढा वेळ आहे कोणाकडे...? त्यापेक्षा त्याच अधिकाऱ्याचा फोन घेऊन, त्याच्यासमोर, त्याच्या वरिष्ठाला खणखणीत जाब विचारणे हे जास्त सोपे नाही का...? त्यामुळे आपण सगळे जण त्यांचा आदर्श घ्या. वेळ पडली तर त्या दोघांकडे कोचिंग क्लास लावा. अधिकाऱ्यांना कसे दमात घ्यायचे..? आपली कामे कशी करून घ्यायची..? यासाठी फिल्डिंग कशी लावायची...? मीडियाला सोबत कसे न्यायचे..? मीडिया येत नसेल तर मोबाईलवाले जास्तीत जास्त सोबत कसे येतील? याचे नियोजन कसे करायचे? हे विषय अभ्यासक्रमात ठेवायला सांगा..!
मागे एका आमदाराने सचिवाच्या दालनात, माझे काम करा, नाहीतर तुमच्या खिडकीतून उडी मारतो... असा दम भरताच त्या अधिकाऱ्याने फाईल चूक की बरोबर न बघता, त्यावर सही कशी केली, तो चाप्टर नक्की अभ्यासाला ठेवा... म्हणजे काम सोपे होईल. आपण हुशार आहात जास्त, त्यामुळे आपल्याला जास्त तपशिलात सांगत नाही. नाहीतर उगाच तुम्ही कानशिलावर प्रसाद द्याल... गणपतीत प्रसाद खाऊन झाला आहे. त्यामुळे तुमच्याकडून वेगळा प्रसाद नको.
जाता-जाता : आपले नेते अजितदादांकडून काही गोष्टी शिका. नेहमी कसे टापटिप राहायला हवे. केस नीट विंचरून जायला हवे. हे त्यांच्याकडून शिका. परवा एका गणेश मंडळात ते गेले होते. बाप्पांसमोर जाण्याआधी त्यांनी तिथेच बाप्पाच्या पायाशी उभे राहून खिशातून स्वतःचा कंगवा काढला... स्वतःचे केस नीट केले. नंतरच बाप्पाचे दर्शन घेतले. ही टापटीप तुम्हाला जमली पाहिजे. जमत नसेल तर दादांना विचारा. टापटीप कसे राहायचे, यावर ते क्लास घेऊ शकतील...
(एकच सूचना : हे असे विषय शालेय अभ्यासक्रमात ठेवले तर सुरुवातीपासून चांगली पिढी तयार होईल, असे आपल्याला वाटते का?)
- तुमचाच बाबुराव