गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:48 AM2021-11-14T06:48:00+5:302021-11-14T06:49:23+5:30
महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० जवानांशी छत्तीसगड सीमेवर झाली चकमक
गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील टेक्केमेटा ते मर्दानटोला पहाडाच्या परिसरातील जंगलात शनिवारी उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यात चार पोलीस जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त केला.
मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश?
सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही मोठे नक्षल नेतेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला कडवा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. तथापि, पोलिसांनी या शक्यतेला दुजोरा देण्यास नकार स्पष्ट दिला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, इतकेच पोलिसांनी सांगितले.
मिलिंद तेलतुंबडे याच्या शिरावर ५० लाखांचे बक्षीस असून, पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, पण तो हाती लागलेला नाही.
गडचिरोलीच्या जंगलात चार वर्षांत झालेल्या मोठ्या चकमकी
२२ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले.
२४ एप्रिल, २०१८ : कसनासूर चकमकीमध्ये पळून जाणाऱ्या १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीपात्रात मिळाले.
२५ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील नैनेरच्या जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले, तर आधीच्या चकमकीतील दोन मृतदेह मिळाले.
१९ ऑक्टोबर, २०२० : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले.
२१ मे, २०२१ : एटापल्ली तालुक्यातील कोटमीच्या जंगलात झालेल्या चकमकीत
१३ नक्षलवादी ठार झाले.
जखमी पोलिसांवर नागपुरात उपचार
या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले असून, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक
पोलिसांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानाचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत कौतुक केले. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून ही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील ही उल्लेखनीय कामगिरी ठरेल. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.