"किमान लस तरी मोफत द्या"; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By जयदीप दाभोळकर | Published: January 5, 2021 02:04 PM2021-01-05T14:04:27+5:302021-01-05T14:08:41+5:30
दोन दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली होती परवानगी
दोन दिवसांपूर्वी देशात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाचा कार्यक्रमही राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून भाजपा नेते आणि प्रवक्त राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्व नागरिकांना करोनाची लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे.
"राज्यातील जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना पॅकेज देणार असल्याचं तुम्ही म्हटलं होतं. परंतु दिलं काहीच नाही. लोकांना कमीतकमी मोफत लस तरी द्या," असं राम कदम म्हणाले. त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. "जगभरात पसरलेल्या कोरोना महासाथीच्या संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्राला याचा याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही राज्यात अधिक आहे. राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे," असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
मा.श्री. उद्धवजी ठाकरेजी @OfficeofUT@rajeshtope11
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) January 5, 2021
राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना साथीच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी कोरोनाची लस मोफत द्यावी .आपण #Corona पैकेज देवू असे म्हणाला होतात निदान #coronavaccination
तरी मोफत द्या pic.twitter.com/dNS6K7GOIS
"केंद्र सरकारनं आर्थिक मदत पुरवली असूनही राज्यातील गरजूंना मदत देण्यात आलेली नाही. शेतकरी, कामगार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षा-टॅक्सी चालक यांना या काळात मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. राज्यातील खराब आरोग्य यंत्रणेमुळे अनेक गरीबांना आपले प्राण गमवावे लागले. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील नागरिकांच्या समस्यांमध्येही अधिक वाढ झाली आहे. त्यांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही," असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.
"भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून राज्यातील जनतेला ही लस मोफत दिली जावी अशी अपेक्षा आहे. राज्यातील जनतेला वेळेत ही लस मोफत मिळेल अशी मी आशा करतो. या आगोदर राज्य सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणून राज्य सरकारनं जनहितासाठी आणि निष्ठेनं जनतेची सेवा करावी. राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे," असंही कदम यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.