निराधार रुग्णाला सोडले रस्त्यावर
By Admin | Published: November 5, 2016 12:41 AM2016-11-05T00:41:37+5:302016-11-05T00:41:37+5:30
एका वयोवृद्ध रुग्णाला रुबी हॉल क्लिनिक या नामांकित खासगी रुग्णालयाने भर रात्री रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला
पुणे : उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत एका वयोवृद्ध रुग्णाला रुबी हॉल क्लिनिक या नामांकित खासगी रुग्णालयाने भर रात्री रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णाला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.
नाना भिवा पांढरे असे या रुग्णाचे नाव आहे. पांढरे सोलापूर येथील असून त्यांच्या रक्तवाहिन्या गोठल्या आहेत. त्यांना ससून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथून उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे न्यावे असे सांगितले. रुग्ण दारिद्र्य रेषेखाली असून, उपचारांसाठी पैसे भरण्याची रुग्णाची परिस्थिती नव्हती. मात्र खासगी रुग्णालयात धर्मादायअंतर्गत येणाऱ्या मोफत उपचारांसाठी रुग्ण पात्र असल्याचे दिसत होते. कागदपत्रेही रुग्णाकडे उपलब्ध असूनही रुग्णालयाने रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. पैसे देण्याची त्याची ऐपत नसल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी त्यांना रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर सोडून देण्यात आले. ऐन थंडीत या रुग्णाला संपूर्ण रात्र रुग्णालयाच्या बाहेर कुडकुडत काढावी लागली.
ससून रुग्णालयात पांढरे यांच्या आजारासंबंधी विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे पत्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिले होते. धमार्दाय आयुक्तालयाच्या अंतर्गत रुबी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात यावे, अशी विनंती ससून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) विभागातर्फे पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र सायंकाळी पाचनंतर मोफत रुग्णांना दाखल केले जात नाही असे सांगत रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलीस कारवाईची धमकी देत सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोन बाहेर रुग्णाला सोडून देण्यात आले. पायाच्या नसा गोठल्याने त्यांना व्यवस्थित चालता येत नसल्याने ते एकाच ठिकाणी रात्रभर बसून होते. पायाला जखमेमुळे वेदना होत असल्याने ते विव्हळत होते.
अशी परिस्थिती इतर रुग्णावर पुन्हा येऊ नये, यासाठी रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पांढरे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
>अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ
या प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. रुग्णालयाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. पी.के. ग्रांट यांना विचारले असता, आपण मागील ८ दिवसांपासून शहरात नसून आपल्याला या प्रकरणाबाबत माहिती नाही असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर बोमी भोट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही वेळी रुग्णाला दाखल करून घेण्यात यावे, असा नियम असतानाही केवळ उपचाराचे पैसे देण्यासाठी असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत पांढरे यांच्यावर उपचार करण्यास रुबी रुग्णालयाने असमर्थता दाखवली. या विरोधात डॅनीयल लांडगे, इरफान शेख व सुनील घाटे यांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.संबंधित प्रकरणाची माहिती लांडगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धमार्दाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्याशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. आयुक्तांच्या आदेशानंतर पांढरे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.