राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा, छगन भुजबळांची विनंती
By Admin | Published: June 30, 2017 05:19 PM2017-06-30T17:19:45+5:302017-06-30T17:31:29+5:30
अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती निवडणुकासाठी आपल्याला सोडण्याची मागणी केली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती निवडणुकासाठी आपल्याला सोडण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती छगन भुजबळांनी केली आहे. पीएमएलए कोर्टाकडे भुजबळांकडून ही विनंती करण्यात आली आहे. भुजबळांच्या विनंती अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र सदन आणि इतर 11 प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण 870 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. 14 मार्च 2016 रोजी 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.
भुजबळांच्या मागणीवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मात्र विरोध करण्यात आला आहे. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे.
ईडीने आपला विरोध दर्शवताना काही प्रमुख मुद्दे मांडले आहेत. पीएमएलए कायद्याच्या कलम 44 नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या 54 व्या कलमानुसार मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही आहे असा दावा ईडीने केला आहे.
सोबतच पीएमएलए कोर्ट एखाद्या कैद्याविषयी विशेष सुविधा देण्याचे आदेश देऊ शकत नाही, असा आदेश हायकोर्ट पुनर्विचार याचिकेवरच देऊ शकते. आणि लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 62(5) राष्ट्रपती निवडणुकीसाठी लागू करता येतं का याची केस सुप्रीम कोर्टासमोर सुरु आहे, त्यामुळे या कोर्टाने त्या संदर्भात कोणतेही आदेश देऊ नयेत. घटनात्मक खंडपीठानं याचा निर्णय घ्यावा अशी मागणी ईडीने केली आहे.
पीएमएलए कोर्टाने आपला अर्ज मागे घेण्याबाबत विचारलं असता छगन भुजबळांच्या वकिलांनी आपण चर्चा करुन निर्णय कळवू अशी माहिती न्यायालयात दिली आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.