सातवा वेतन आयोग सोडून बोला - एसटी महामंडळ
By admin | Published: May 30, 2017 04:22 AM2017-05-30T04:22:55+5:302017-05-30T04:22:55+5:30
वेतनवाढ देण्यास एसटी प्रशासन तयार असतानाच कामगार संघटनेच्या आडमुठेधोरणामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळत नसल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेतनवाढ देण्यास एसटी प्रशासन तयार असतानाच कामगार संघटनेच्या आडमुठेधोरणामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात आहे.
एसटीमधील विविध कामगार संघटना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी संप करण्याच्या तयारीत आहे. मात्र अधिकृत संघटनांनी संप करण्याची नोटीस न देता संप पुकारणे हे नियमबाह्य आहे. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांचा अवधी दिल्यानंतर संप पुकारण्यात येतो. नियमानूसार वेतनवाढ हा एसटी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर चर्चा करुन वेतन वाढ करण्यास एसटी प्रशासन तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एसटी उत्पादक महामंडळ असल्याने शासन पगारासाठी मदत करु शकत नाही.
चार वर्षांनी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होते. त्यामुळे यंदा वेतनवाढीसाठी एसटी प्रशासन तयार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सर्वात कमी आहे. आर्थिक नफा वाढवण्यासाठी एसटी लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ राबवणार आहे. मात्र कर्मचारी संघटनेच्या अवास्तव मागण्यांमुळे वेतन वाढ रखडली असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
जानेवारी २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आॅक्टोबर २०१६ मध्ये वाटाघाटीस सुरुवात झाली. यानंतर प्रशासनासोबत १२ वेळा बैठक झाली. १३ एप्रिल १७ मध्ये राज्य परिवहन व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामांचे स्वरु प वेगळे असल्याने सातवा वेतन आयोग शक्य नाही, असे शासनाचे म्हणणे आहे. १ जूनला राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात नोटीस देऊन संप पुकारण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले.