भाजप सोडून उद्धवसेनेत, पण उमेदवारी नाहीच! उन्मेष पाटील यांच्याऐवजी करण पवार यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:08 AM2024-04-04T08:08:32+5:302024-04-04T08:09:32+5:30
Unmesh Patil in Shiv Sena UBT: जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र पाटील यांच्यासोबत उद्धवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली.
मुंबई - जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र पाटील यांच्यासोबत उद्धवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली.
उद्धवसेनेने बुधवारी जळगाव, हातकणंगले, कल्याण व पालघरच्या उमेदवारांची घोषणा केली. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
कल्याण : शिंदेसेनेचे कल्याणमधील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव सेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या आहेत. मनसेतून त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. वैशाली दरेकरांनी २००९ मध्ये मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, त्यांना १ लाख २ हजार मते मिळाली होती.
हातकणंगले : सत्यजीत पाटील यांना उमेदवारी. ते आणि त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर हे दोघेही दोन वेळा आमदार राहिले आहेत.
जळगाव : पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे विद्यमान पारोळा एरंडोल विधानसभा प्रमुख करण पवार हे उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. याआधी करण पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, हा मतदारसंघ उद्धवसेनेकडे गेल्याने त्यांनी उद्धव सेनेत पाटील यांच्यासह प्रवेश केला. आमदार भास्कर पाटील यांचे नातू आहेत. २००९ साली ते राष्ट्रवादीतून नगरसेवक म्हणून निवडून आले २०१४ मध्ये भाजप प्रवेश करीत नगराध्यक्ष झाले.
पालघर : भारत कामडी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.