कळंबोलीत डिझेलवाहिनीला गळती
By admin | Published: July 18, 2014 02:53 AM2014-07-18T02:53:18+5:302014-07-18T02:53:18+5:30
पनवेल-सायन महामार्गालगत कळंबोली मार्बल मार्केट परिसरात गुरुवारी अचानक डिझेलच्या पाईपलाईनला गळती लागली.
पनवेल : पनवेल-सायन महामार्गालगत कळंबोली मार्बल मार्केट परिसरात गुरुवारी अचानक डिझेलच्या पाईपलाईनला गळती लागली. त्यामध्ये लाखो लीटर डिझेल पाण्यात गेले. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळताच पेट्रोलियम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इंधन वाहिनी दुरुस्त केली.
पनवेल-सायन महामार्गाला समांतर एचपी कंपनीची इंधन वाहिनी आहे. आज दुपारी कळंबोली मार्बल मार्केटजवळ या डिझेल वाहिनीला गळती लागली. त्यातून डिझेलची गळती होऊन ते बाजूच्या नाल्यात वाहू लागले. आजूबाजूला वास येऊ लागल्याने या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. त्याचबरोबर मुंबई आणि खोपोली येथील एचपी कंपनीच्या केंद्रालाही माहिती देण्यात आली. त्यानंतर या कंपनीचे अधिकारी तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले.
त्याचबरोबर कळंबोली, कामोठे आणि वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मार्बल मार्केटमध्ये आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने सर्व वाहने महामार्गावर उभी राहिल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र या डिझेलच्या वाहिनीला गळती लागण्याचे कारण समजू शकले नाही.
अंबरनाथमध्ये अॅसिड गळती
काटई-कर्जत मार्गावर अंबरनाथ नजिकच्या रंगोली हॉटेलजवळ गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका टँकरमधून अॅसिड गळती सुरू झाली. गळतीनंतर चालक पळून गेला असून अग्निशमन दलाकडून गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ खबरदारीचा उपाय म्हूणन पोलिसांनी वाहतूक थांबवली आहे़ (वार्ताहर)