एलईडीने दिला नवा प्रकाश

By admin | Published: March 8, 2016 02:42 AM2016-03-08T02:42:57+5:302016-03-08T02:42:57+5:30

पंढरपूरसारख्या छोट्या शहरातून एक मुलगी इंजिनीअर होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं हे पक्कं होतं.

LED light given by LED | एलईडीने दिला नवा प्रकाश

एलईडीने दिला नवा प्रकाश

Next

विजया जांगळे,  मुंबई
पंढरपूरसारख्या छोट्या शहरातून एक मुलगी इंजिनीअर होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं हे पक्कं होतं. नेमकं काय करायचं, याचा धांडोळा घेण्यासाठी सुरुवातीला काही काळ नोकरी केली. अनुभव गाठीशी बांधल्यानंतर उद्योगाच्या आकाशात भरारी घेण्यास ती सज्ज झाली. आज तिने एलईडी लॅम्प्सची मिलक्स कंट्रोल गिअर्स प्रा. लि. (मेल्कॉन ब्रँड) कंपनी स्थापन केली आहे. तिच्या दिव्यांचा प्रकाश देशभरच नव्हे, तर युरोपातही पोहोचला आहे. कंपनीचे टर्नओव्हर साडेतीन कोटींच्या घरात आहे. त्या आहेत, पुण्याच्या मानसी बिडकर.
मानसी यांनी पुण्यातल्या कुसरो वाडिया कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर सुरुवातीची तीन-साडेतीन वर्षे नोकरी केली. ही स्वतंत्र व्यवसायाची पूर्वतयारी होती. नंतर त्यांनी ‘लेक्सस’ या नावाने प्रोप्रायटरी मिळवून इमर्जन्सी लॅम्प्सचं उत्पादन सुरू केलं. आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी २००५मध्ये त्यांनी ‘मिलक्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी स्थापन केली.
एलईडी लॅम्प्सच्याच क्षेत्रात यावं असं का वाटलं, या प्रश्नावर मानसी सांगतात, ‘आपल्या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स कळावेत, म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रदर्शनांना भेट देतो. हाँगकाँगला एका प्रदर्शनात एलईडी लाइट्ससंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा आपल्याकडे एलईडी लाइट्स फारसे प्रचलित नव्हते. या वीजबचत करणाऱ्या दिव्यांची आपल्याही देशात गरज असल्याचं लक्षात आलं आणि एलईडी लाइट्सचं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
उद्योग क्षेत्रात उतरताना सर्वात मोठं आव्हान असतं ते भांडवलाचं. जागा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, कच्चा माल असे हजारो खर्च असतात. वेळही खूप द्यावा लागतो.’ मेल्कॉनची स्थापना झाली, तेव्हा मानसी यांचा विवाह झाला होता, पण त्यांचं मोठं, एकत्र कुटुंब त्यांच्यासाठी बलस्थान ठरलं. ‘घरी बसून राहू नका, काहीतरी वेगळं करा,’ असं सासरच्या मंडळींचं नेहमी सांगणं असे. त्यांनी घरातच व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला केवळ दोन कामगार होते. वाढत्या व्यवसायाला घर अपुरं पडू लागलं. त्यामुळे त्यांनी २००९-१० मध्ये कर्ज काढून पुण्यातल्या मुकुंदनगरात जागा घेतली. सुरुवातीला दोन-तीन वर्षे काम कमी आणि खर्च जास्त होते. कर्जाचे मोठे हप्ते भरणं फार अवघड गेलं. त्यानंतर मात्र त्यांनी व्यवसायात पाय रोवले. झालेला नफा पुन्हा नवनवी यंत्रसामुग्री घेण्यात गुंतवला. आज २२ वितरकांच्या माध्यमातून त्यांचे दिवे देशभर पोहोचले आहेत. त्यांच्या डिझाइन डेव्हलपमेंट लॅबमध्ये सातत्याने प्रयोग आणि चाचण्या सुरू असतात. जर्मनी, सिंगापूरमधून कच्चा माल आयात केला जातो. त्यांच्या कंपनीने आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र मिळवलं आहे.
फॉर्च्युन ५००मध्ये यायचं आहे!
येत्या सात वर्षांत आणखी मोठा सेटअप सुरू करण्याचं व १५ वर्षांत फॉर्च्युन ५००मध्ये स्थान मिळवण्याचं लक्ष्य त्यांनी निश्चित केलं आहे.

Web Title: LED light given by LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.