एलईडी दिव्यांनी उजळणार उपराजधानी
By admin | Published: February 5, 2015 01:06 AM2015-02-05T01:06:15+5:302015-02-05T01:06:15+5:30
उपराजधानीतील रस्ते आता एलईडी दिव्यांनी उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांची जागा आता एलईडी दिवे घेणार आहेत. असे २७ हजार दिवे लावले जातील. या कामास सुरुवातही झाली आहे.
ऊर्जा व खर्चाची बचत : २७ हजार दिवे लागणार
नागपूर : उपराजधानीतील रस्ते आता एलईडी दिव्यांनी उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांची जागा आता एलईडी दिवे घेणार आहेत. असे २७ हजार दिवे लावले जातील. या कामास सुरुवातही झाली आहे. संविधान चौकात रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा पांढरा शुभ्र झगमगाट अनुभवायला मिळत असून लवकरच संपूर्ण नागपूर शहरात असे चित्र पहायला मिळणार आहे. राज्यात एलईडी दिवे लावणारी नागपूर महापालिका ही एकमेव ठरणार आहे.
वीज बचतीसाठी एलईडी दिवे वापरा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. नागपूर महापालिकेने याची त्वरित अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे. सध्या फिलिप्स कंपनीचे १०० वॉटचे दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे लावण्याचे काम जे.के. सोल्युशन या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी मनपाला कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही. शहरातील रस्त्यांवर सव्वालाख हायमास्ट दिवे आहेत. या दिव्याची जागा एलईडी दिवे घेणार आहेत. या दिव्यांचे दोन टप्प्यात डिमींग करण्याचे नियंत्रणही केले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होणार आहे. यातून ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होण्याची अपेक्षा आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलातही बरीच कपात होऊन महापालिकेची आर्थिक बचतही होईल. (प्रतिनिधी)
कंत्राटदार करणार ४३ कोटींचा खर्च
या प्रकल्पावर ४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च कंत्राटदार कंपनीच करेल. पुढील १३ वर्षे कंपनी यावरील ९० टक्के खर्च करणार असून महापालिकेला केवळ १० टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक भार पडणार नाही. या दिव्याचे रिमोट कंट्रोलिंग व मॉनिटरिंग महापालिकेकडे राहील.
४ जी साठी खांबावरून केबल
शहरात ४ जी साठी शहरात २३० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे. आजवर ६० टॉवर उभारण्यात आले आहेत. संबंधित टॉवर जोडण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जेथे ही सुविधा नाही, अशा भागात वीज खांबावरून केबल टाकले जात आहेत. याबाबत रिलायन्सने महापालिकेसोबत करार केला आहे. ५ हजार खांबावरून केबल टाकले जातील. कंपनीने यासाठी महापालिकेला १.४४ कोटी दिले आहेत.