झाड लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका
By admin | Published: May 26, 2016 01:15 AM2016-05-26T01:15:29+5:302016-05-26T01:15:29+5:30
कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही झाड लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला रोख बक्षीस मिळेल.
मुंबई : कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही झाड लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला रोख बक्षीस मिळेल.
वन विभागाच्या वतीने येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात अडीच कोटी झाडे लावली जाणार आहेत. त्यात लोकसहभाग असावा म्हणून सेल्फीसह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज लोकमतला ही माहिती दिली. सेल्फी स्पर्धेचे स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
अडीच कोटीपैकी दीड कोटी झाडे ही वन विभागातर्फे लावण्यात येणार आहेत. ५० लाख झाडे रेल्वेच्या जागांमध्ये वा रेल्वेच्या वतीने लावण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकामसह विविध शासकीय विभाग या महाअभियानात सहभागी होणार आहेत. वन विभागाशिवाय अन्य विभागांकडून ५० लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लावलेल्या प्रत्येक झाडाची माहिती, ते कोठे लावले आहे, ते जगविण्याची जबाबदारी कोणावर आहे याचा संगणकीकृत डाटा तयार करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
साबरमतीच्या धर्तीवर चंद्रभागेचा विकास
अहमदाबादमधील साबरमती नदीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच तेथील कामांची पाहणी करणार आहेत. साबरमतीच्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ मोहीम राबविली जाणार आहे.