भाजपातून बाहेर पडणार, पण 'अब की बार मोदी सरकार'!; नारायण राणेंचा 'बाहेरून पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:14 PM2019-02-19T13:14:18+5:302019-02-19T13:14:45+5:30
शिवसेना फक्त 10 जागा जिंकेल असे भाकितही राणे यांनी केले.
मुंबई : गेल्या 4 वर्षात भ्रष्टाचार कुठे कमी झाला. मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो. तो लपवण्यासाठी ही युती झाली. या काळात काय विकास केला हे सरकारने सांगावे. माझा आघात शिवसेनेवर असेल मात्र, भाजपवर नसेल. मी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला नाही, सरकारचा केला. खासदारकी दिलीय त्यामुळे थोडेतरी नियम पाळावे लागतील, असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
शिवसेना-भाजपाच्या युतीच्या घोषणेवर नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर राणे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. मी स्वबळावर लढणार नाहीतर काय करणार. माझ्या पक्षाचा जन्म भाजपच्या सांगण्यावरूनच झालेला आहे. भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलो. मात्र, राजीनामा का द्यावा, मी भाजपाचा सदस्य नाही. त्यांनी घेतले त्याला मी काय करू. खासदारपदी ठेवावे की न ठेवावे त्यांनी ठरवावे. दोन पक्षांचे जाहीरनामे मी कसे बनवणार. माझ्या पक्षाचा जाहीरनामा मीच काढणार. त्यांना तसे कळवणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
नितेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. ते स्वाभिमान पक्षात सहभागी होतील का, तर राणे यांनी हो असे उत्तर दिले. माझा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार आहे. मग तो मराठवाडा असो की विदर्भ. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत मी लढणार की नाही ते ठरवणार आहे. महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. पाठिंबा दिला म्हणजे महाआघाडीत जाणे होत नाही. तटकरेंना पाठिंबा दिला तेव्हा मी राष्ट्रवादीत गेलो असे झाले नव्हते, असेही राणे म्हणाले.
उरली नाही नीती, 'मातोश्री'च्या फायद्यासाठीच केली युती; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहारhttps://t.co/kMs3NPYHr4@NiteshNRanepic.twitter.com/r9i9tjPpte
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
दरम्यान, शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष असून त्यांच्या नेत्यांनी युती करून स्वत:चीच फजिती करून घेतली. भाजपा वाल्यांनी सांगितले असेल की आता सडवणार नाही. यामुळे जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झाल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. ही मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत. कित्येक प्रकल्प मातोश्रीच्या भागीदारीवर सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना फक्त 10 जागा जिंकेल असे भाकितही राणे यांनी केले.