डावललेले निष्ठावंत नाराज
By admin | Published: February 7, 2017 11:49 PM2017-02-07T23:49:50+5:302017-02-07T23:49:50+5:30
जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जिल्ह्यातून अनेक आजी-माजी आमदार व खासदारपुत्रांची तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष माजी आमदारांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने
गणेश धुरी , नाशिक
जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जिल्ह्यातून अनेक आजी-माजी आमदार व खासदारपुत्रांची तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष माजी आमदारांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने निवडणूक घमासान होण्याची चिन्हे आहेत. याच अनुषंगाने मिनी मंत्रालयासाठी घराणेशाहीची परंपराही कायम राहिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकलहरे गटातून खासदारपुत्र अजिंक्य हेंमत गोडसे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या शंकर धनवटे यांच्यासाठी एकलहरे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरातही एक नव्हे, तर दोन-दोन उमेदवारांचे ‘दान’ भाजपाने टाकले आहे. खासदारपुत्र समीर चव्हाण कनाशी (कळवण) गटातून निवडणूक लढवित असून, खासदार पत्नी कलावती चव्हाण हट्टी (सुरगाणा) गटातून निवडणूक लढवित आहेत. आमदार निर्मला गावित यांच्या झोळीतही कॉँगे्रसने दोन उमेदवारी टाकल्या आहेत. मुलगी नयना गावित या वाडीवऱ्हे गटातून, तर चिरंजीव हर्षल गावित ठाणापाडा गटातून निवडणूक लढवित आहेत. आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी धोंडमाळ (पेठ) गटातून नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी केली आहे. चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांचे चुलत बंधू केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर यांनी लोहणेर (देवळा) गटातून उमेदवारी केली आहे. तोच प्रकार निफाड आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतिन कदम यांनी ओझर गटातून उमेदवारी केली आहे. या शर्यतीत माजी आमदारही मागे नाहीत. अनेक माजी आमदारांच्या कुटुंबीयांनीही विविध पक्षांकडून उमेदवारी मिळविली आहे. (प्रतिनिधी)