सफाई कामगारांसाठी झोकून दिलेला नेता हरपला! - साबडे
By Admin | Published: March 4, 2017 02:16 AM2017-03-04T02:16:01+5:302017-03-04T02:16:01+5:30
कामगार नेते दिगंबर सातव यांच्या जाण्याने कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी व्यक्त केले
मुंबई : महापालिका कामगार नेते दिगंबर सातव यांच्या जाण्याने कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी व्यक्त केले. म्युनिसिपल मजदूर युनियन व संलग्न संघटनांनी ना.म.जोशी मार्ग येथील कै. गोपाळ शेट्टीगार सभागृहात दिगंबर सातव यांची शोकसभा आयोजित केली होती, त्यात साबडे बोलत होते.
साबडे म्हणाले की, गेली ५० वर्षे सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी सातव यांनी झोकून दिले होते. संयमाने संघर्ष करून आंदोलन कोठे थांबवायचे, याचे अचूक ज्ञान सातव यांना होते. कामगारांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे आणि कामगारांशी बांधिलकी ठेवणारे नेते म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी म्युनिसिपल मजदूर युनियनमधील सातव यांचे सर्व सहकारी नक्कीच भरून काढतील, अशा शब्दांत साबडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
साफसफाई खात्यातील कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या हक्कांसाठी लढणारा माझा सहकारी हरपला, अशा शब्दांत युनियनचे सरचिटणीस अॅड. महाबळ शेट्टी यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी युनियनचे कार्याध्यक्ष वामन कविस्कर, अशोक जाधव, उपाध्यक्ष महेश महेडा, कामगार नेते शंकर शेट्टी, ज्येष्ठ कामगार नेते शंकर साळवी आणि अन्य नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)