विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:31 AM2019-06-19T02:31:32+5:302019-06-19T02:31:48+5:30

हक्काच्या पाण्यावर चर्चा तरी होणार की नाही?

Legislative Assembly: What is the water of Marathwada? | विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

Next

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला; पण सरकारकडून काही ठोस उपाययोजना दिसल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले की, कोकणाचे पाणी मराठवाड्याला देऊ, कधीच दुष्काळ पडू देणार नाही, अशा वल्गना करतात; पण पाठ फिरली की ते सारे विसरून जातात. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचे तरी बोला, त्यावर तरी विधिमंडळात चर्चा घडवून आणा, अशी किमान अपेक्षासुद्धा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी पावसाळा आला की, अहमदनगर व नाशिकची मंडळी कधी मराठवाड्याच्या अंगावर धावून येतील, याचा नेम नाही. हक्काच्या पाण्यासाठी सतत संघर्ष सुरूआहे; पण न्याय मिळत नाही.
 
हे व्हायला पाहिजे 
कृष्णेचे हक्काचे पाणी मिळाल्यास उस्मानाबाद, बीड व काहीअंशी लातूरचा प्रश्न सुटू शकतो. वैनगंगा, इंद्रावती व प्राणहिता या नद्यांचे ३० ते ४० टीएमसी पाणी मिळाल्यास नांदेड, परभणी जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो. हे पाणी येलदरी व उर्ध्व पैनगंगामध्ये टाकता येऊ शकते. वैतरणा, दमण गंगा व पिंजाळ या नद्यांचे पाणी उचलता आल्यास औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याला लाभ मिळू शकेल. सध्या नीरेचा वाद जोरात सुरूआहे. हे पाणी मराठवाड्याला मिळू शकेल की नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

मी प्रेझेंटेशन द्यायला तयार - नागरे
२० जून रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक होणार आहे; पण अद्याप मला निरोप नाही. आल्यास मी नक्की जाणार आहे व तेथे प्रेझेंटेशनही द्यायला तयार आहे. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही पाण्यासंबंधी त्यांची नोट सरकारला दिली आहे. त्यावरही चर्चा व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आमदारांबरोबर एकत्रित चर्चा करण्याची गरज आहे, असे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगितले.

विधानसभेत चर्चा होणार - बंब
गंगापूरचे आमदार व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर नेहमीच आग्रही भूमिका घेणारे प्रशांत बंब म्हणाले, यावेळी विधानसभेतच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नुकतीच लातूरला विकास परिषद झाली. त्याला मी उपस्थित होतो. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायलाच पाहिजे.

जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे व अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यापूर्वीच कोकणचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली होती. ही गोष्ट अव्यवहार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Legislative Assembly: What is the water of Marathwada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.