विधान परिषदेसाठी ‘काँटे की टक्कर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:15 AM2018-05-08T05:15:02+5:302018-05-08T05:15:02+5:30
राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी ‘कांटे कीं टक्कर’ होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात रमेश कराड यांंनी घेतलेली माघार म्हणजे पंकजाताईंचे धक्कातंत्र मानले जात असल्याने येथील लढत आतापासूनच लक्षवेधी झाली आहे. कोकणात तटकरे-साबळे अशी थेट लढत असून उर्वरित दोन मतदारसंघांत तिरंगी सामना होणार आहे.
मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी ‘कांटे कीं टक्कर’ होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात रमेश कराड यांंनी घेतलेली माघार म्हणजे पंकजाताईंचे धक्कातंत्र मानले जात असल्याने येथील लढत आतापासूनच लक्षवेधी झाली आहे. कोकणात तटकरे-साबळे अशी थेट लढत असून उर्वरित दोन मतदारसंघांत तिरंगी सामना होणार आहे.
कोकणात थेट लढत
रायगड -रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे सहा अर्जांपैकी चार अर्ज मागे घेण्यात आले. आता राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे या दोघांमध्येच चुरशीची लढत होणार आहे. स्वाभिमान पक्षाची भूमिका अजून जाहीर झालेली नसल्याने या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
या मतदारसंघात शिवसेनेची स्वत:ची ताकद मोठी आहे. स्वाभिमान कोणती भूमिका घेणार, हे अजू जाहीर झालेली नाही. परंतु ते कसल्याही परिस्थितीत शिवसेनेला मदत करणार नाहीत. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीला त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने सेनेशी युती केली असली तरी दोन्ही पक्षांमधील सवतासुभा जाहीरच आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.
नाशिकमध्ये सहाणे, दराडे, कोकणी अशी तिरंगी लढत
नाशिक विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे अॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेज कोकणी अशी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड तसेच देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी माघार घेतली.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेज कोकणी यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता होती. परंतु कोकणी यांनी अर्ज कायम ठेवला.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अॅड. सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात आहेत. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक
गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज
आहे. शिवसेना भाजपाने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यात कोकणी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अॅड. सहाणे यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही सहाणे यांनी आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पारडे
जड वाटत असले तरी कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने चुरस निर्माण झाली आहे.
निवडणुकीचे ‘अर्थ’कारण; बहीण-भावाचे राजकारण!
-लातूर : स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे ‘मूल्य’ दिवसेंदिवस वाढत असून, येथे अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक मैदानही सध्या एकमेकांवरील कुरघोड्यांनी गाजत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली माघार अनेक अर्थाने प्रश्न उभे करणारी आहे.
- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि लातूर भाजपाचे नेते रमेश कराड यांना पक्षात आपली बाजू मांडणाऱ्या बहिणीशिवाय दुसरे कोणी नाही, असे वाटले. अन् त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा पंकजातार्इंना धक्का असल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना पंकजातार्इंनी सुरेश धस यांच्यामुळे राष्ट्रवादीलाच धक्का असल्याचे म्हटले. अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेले राजकीय नाट्य सर्वांनाच धक्का देणारे ठरले. त्यातही बहिणीकडून भावाला मोठा धक्का असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.
- कराड यांना राष्ट्रवादीने पक्षात घेऊन बी फॉर्म दिला व उमेदवारी अर्ज भरला होता. कराड यांनी घेतलेली माघार भाजपाला साह्यभूत ठरणारी आहे, असा एक तर्क लढविला
जात आहे. प्रत्यक्षात भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्या पक्षाचा वनवास संपवून स्वगृही आलो म्हणजेच राष्ट्रवादीत आलो म्हणणारे रमेश कराड केवळ भाजपाचा मार्ग सुलभ व्हावा, या एकमेव कारणासाठी आपला राष्ट्रवादीकडून भरलेला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत.
- राष्ट्रवादीने पक्षप्रवेश देताना उमेदवारीचे आश्वासन पाळले. त्यात राजकीय ‘मूल्य’ कुठे ढासळले, हे एकमेकांची तोंडे उघडल्यावरच कळणार आहे. बहीण-भावाची राजकीय कुरघोडी, मानलेल्या भावाचा धक्कादायक निर्णय या भोवती चर्चा होत असली तरी पडद्यामागे आणखी बरेच काही घडले आहे.
दुरंगी लढतीकडे लक्ष...
काँग्रेस सकारात्मक निर्णयाच्या वाटेवर आहे. आघाडीचा धर्म अपक्षाच्या पाठीशी राहिला तर भाजपाला याही स्थितीत तूल्यबळ टक्कर द्यावी लागेल. १००६ मतदारांच्या गाठीभेटी, इतर मुद्दे कसे हाताळले जातील, यावर उमेदवारांच्या पदरी मतांचे मूल्य पडेल. एकंदर कोण कोणाच्या पाठीशी आहे, स्वपक्षातही कोणाचे उट्टे काढले गेले, हे निकालानंतर कळेल.
कराडांवर सत्ताधा-यांचा दबाव
रमेश कराड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. कराड यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्याअनुषंगाने सत्ताधा-यांनी कराडांवर दबाव आणला, असा आरोप राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी औराद शहाजानी (लातूर) येथे केला.
परभणी - हिेंगोलीत तिरंगी लढत
- परभणी- परभणी- हिंगोली मतदारसंघात भाजपाचे डॉ. प्रफुल्ल पाटील, अपक्ष सुशील देशमुख यांनी अर्ज माघार घेतल्याने काँग्रेस- शिवसेना व अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे.
- काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बजोरिया यांच्याखेरीज काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले सुरेश नागरे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
- युती झाल्याने नागरे माघार घेतील, अशी अपेक्षा होती. दुपारी तीनपर्यंत नागरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाहीत. ३.०७ वाजता ते आले व त्यांनी आपण उमेदवारी परत घेणार असल्याचे जिल्हाधिकाºयांना सांगितले; परंतु, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांनी वेळ संपल्याचे सांगितले. त्यानंतर नागरे परतले.
पंकजा मुंडेंची धनंजयवर कुरघोडी
- चेतन धनुरे/सतीश जोशी
उस्मानाबाद/बीड : विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपातून खेचून आणलेले राष्ट्रवादीचे रमेश कराड यांनी माघार घेतली. त्यामुळे अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आघाडीवर आली. कराडांना राष्ट्रवादीत घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना धक्का दिला होता. कराडांच्या माघारीने पंकजा यांनी धनंजय यांच्यावर कुरघोडी केली.
भाजपाचे कराड यांनी राष्टÑवादीतर्फे तर राष्टÑवादीचे धस यांनी भाजपाकडून अर्ज भरले. आता धस व आघाडी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात लढत होईल. कराड यांनी अर्ज मागे घेतला तेव्हा सुरेश धस व आ. सुजितसिंह ठाकूर जिल्हाधिकारी कार्यालयात होते. हा भाजपाचा ‘गेम प्लॅन’ असल्याचे बोलले जाते. कराड व इतर अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादी नेत्यांना लागल्याने त्यांनी जगदाळेंचा अर्ज कायम राहण्यास प्रयत्न केले. जगदाळे हे सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत होते़
वेळ आली की बोलेन
मी राष्ट्रवादीवर नाराज वगैरे काही नाही़ योग्य वेळ आल्यानंतर बोलेन, असे रमेश कराड यांनी सांगितले.