विधान परिषदेचे सभापती पायउतार, भाजपा - राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र
By Admin | Published: March 16, 2015 03:46 PM2015-03-16T15:46:30+5:302015-03-16T18:49:08+5:30
सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणा-या भाजपाने आता राष्ट्रवादी पक्षाच्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजुने मतदान करून भाजपाने आपण सत्तेच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी असल्याचे दाखवून दिले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणा-या भाजपाने आता राष्ट्रवादी पक्षाच्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजुने मतदान करून भाजपाने आपण सत्तेच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनेने अविश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या सभापतींना अविश्वासदर्शक ठरावामुळे पायउतार व्हावे लागले आहे.
याआधी, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरुन सोमवारी शिवसेना व भाजपामध्ये चांगलीच जुंपली होती. कोण कोणाचं चुंबन घेतय हे लवकरच कळेल अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर निशाणा साधला होता. तर शिवसेनेत काय चाललंय हेच कळत नसेल तर इथं काय चाललंय हे कसं कळणार असा चिमटा भाजपा आमदार गिरीश बापट यांनी कदम यांना काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत हा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी ४० मतांची आवश्यकता होती. राष्ट्रवादीकडे २८ आमदारांचे संख्याबळ होते. उरलेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपाच्या १२ आमदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि एकूण ४५ मते मिळून अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला.शिवसेनेचे विधानपरिषदेत सात आमदार असून त्यांनी या प्रस्तावावर बहिष्कार टाकला.
राष्ट्रवादीने आज प्रस्ताव मांडल्यावर काँग्रेसने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील भूमिका काय असा सवाल काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी विचारला. तर शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी तिखट शब्दात भाजपा व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने काँग्रेसला तर भाजपाने शिवसेनेला फसवलं असून भाजपा व राष्ट्रवादी कधी एकत्र आले हे आम्हालाही कळले नाही असे कदम यांनी सांगितले. यावर भाजपा आमदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला.