राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:46 AM2022-06-12T05:46:41+5:302022-06-12T05:47:03+5:30

“राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है...” पहाटे साडेचार-पाचला विजयाचा जल्लोष साजरा करताना भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर या घोषणेने परिसर दणाणून सोडला. 

Legislative Council election is main target BJP warns of to mahavikas aghadi | राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा

राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा

Next

मुंबई :

“राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है...” पहाटे साडेचार-पाचला विजयाचा जल्लोष साजरा करताना भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर या घोषणेने परिसर दणाणून सोडला. 

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विजयी उमेदवार पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, केंद्रीय निरीक्षक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार निकालानंतर बाहेर येताच एकच जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून आनंद साजरा झाला अन् त्याचवेळी विधान परिषदेत महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. 

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार असून त्यात आता पाच नाही तर सहा जागा निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे  यांना उमेदवारी दिली आहे. 

सोबतच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (अपक्ष) यांना पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असेल आणि आणखी एक चमत्कार बघायला मिळेल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला.  

शिवसेनेने या निवडणुकीत सचिन अहीर, आमश्या पाडवी, काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप तर राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांचा डमी अर्ज आहे. मुख्यत्वे दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणार आहेत. 

सहाव्या जागेचा निकाल अन् आघाडीत शुकशुकाट
- पहाटे साडेतीनच्या सुमारास एकेक निकाल आला तसा विधानभवनाबाहेर जल्लोष सुरू झाला. संजय राऊत जिंकताच भगवे झेंडे फडकवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली पण संजय पवार यांचा पराभव होताच त्यांच्या घोषणा थांबल्या. 
- संजय पवार यांचा पराभव दिसताच राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील पटकन निघून गेले. राष्ट्रवादीचे एकेक नेतेही निघून गेले. सगळ्यात शेवटी विधानभवनातून बाहेर पडले ते शिवसेनेचे मंत्री व आमदार. पण त्यांचे चेहरे कोमेजले होते.

हा विजय लक्ष्मणभाऊ अन् मुक्ताताईंना समर्पित
विजयाबद्दल आभाराचे भाषण देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भावुक झाले. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले आमचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांनी विधानभवनात येऊन मतदान केले आणि अपूर्व पक्षनिष्ठेचे दर्शन घडविले, आजचा विजय मी त्यांना समर्पित करीत आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवरील पराभवामुळे बॅकफूटवर गेलेली महाविकास आघाडी विरुद्ध आत्मविश्वास दुणावलेला भाजप अशी ही लढत असेल. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे.

बेछूट बोलणारे राऊत ब्रह्मदेव आहेत का? आ. देवेंद्र भुयार यांचा सवाल
मी महाविकास आघाडीला मतदान केले नाही, हे संजय राऊत कशाच्या भरवशावर सांगतात, ते काय ब्रह्मदेव आहेत का, असा सवाल वरुडचे (जि. अमरावती) आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. राऊत यांनी महाविकास आघाडीशी दगाबाजी केल्याचा आरोप करताना आमदारांची जी नावे घेतली त्यात भुयार यांचाही समावेश होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भुयार म्हणाले, अपक्षांचे मतदान गोपनीय असते; मग मी आघाडीला मतदान केले नाही, हे राऊत कशाच्या आधारे सांगत आहेत. मी दगाफटका केलेला नाही. मी आघाडीलाच मतदान केले. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे. ती मी उघडपणे व्यक्त केली. नाराजी त्यांच्यापुढे नाही तर दाऊदसमोर मांडायची का?

मी हरभरे खाणारा नाही, स्वाभिमानी नेता आहे! आ. संजयमामा शिंदे यांचे प्रत्युत्तर
‘आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, तुमचे नेते आमच्या सोबत ठेवले होते, सूचनेप्रमाणे आम्ही मतदान केले. पराभवानंतर आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही घोडेबाजारमधले आहोत का? मी हरभरे खाणारा नाही, स्वाभिमानी नेता आहे, हे राज्यातील सर्व नेत्यांना माहीत आहे,’ अशा शब्दांत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बिनविरोध पाठिंबा दिला. मी विकला जाणारा नेता नाही. मला किती वेळा शिवसेनेची ऑफर होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेनेला मत न देणाऱ्यांची नावे समोर येतीलच; आ. आशिष जयस्वाल यांचे स्पष्टीकरण
शिवसेनेसोबत असलेले अपक्ष सोबतच राहिले. इतर अपक्षांनी साथ सोडली. मी अपक्ष असलो तरी शिवसैनिक आहे. मी ऋणाची परतफेड केली. मतपत्रिका दाखविणे बंधनकारक नव्हते. मात्र, मतपत्रिकेवरील क्रमांकावरून कुणी कुणाला मत दिले हे समजते. काही नावे समोर आली आहेत. काही आणखी पुढे येतील, असे आ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ज्यांनी मतदानात गडबड केली, त्यांना शोधणे कठीण नाही. आम्ही पक्षाचा आदेश मानून मतदान केले. या पराभवातून आम्ही बरेच काही शिकलो. पुढे तगडे नियोजन करू. ज्या मंत्र्यांबद्दल नाराजी नहोती त्याचीच तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याचा या निवडणुकीशी संबंध नव्हता, असेही ते म्हणाले.

Web Title: Legislative Council election is main target BJP warns of to mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.