विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 06:13 AM2024-07-05T06:13:21+5:302024-07-05T06:14:04+5:30
शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत.
मुंबई - विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. १२ पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध होईल.
निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. विधानसभेतील २८८ पैकी १४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे २७४ आमदार मतदान करणार असून, विजयासाठी २३ (२२.८४ ) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.
महायुतीकडे किती संख्याबळ?
विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी त्यांना ११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.
शिंदेसेनेने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना सात अतिरिक्त मते लागतील.
अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही सहा मतांची तजवीज करावी लागणार आहे. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत.
मविआकडे किती संख्याबळ?
काँग्रेसकडे ३७ मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली असल्याने त्यांच्याकडे १४ मते अतिरिक्त आहेत. ही अतिरिक्त मते त्यांनी उद्धवसेनेला देण्याचे मान्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःची १५ मते आहेत. याशिवाय एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आपले स्वीय सहायक व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते मिळाली तर नार्वेकर निवडून येऊ शकतात.
महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे पक्षाचे केवळ एकच मत आहे. याशिवाय समाजवादी पार्टी व माकप यांची तीन मते त्यांना मिळू शकतात. शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिला आहे. पवार गटाकडे १२ आमदार आहेत. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागेल. आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. तेवढी मते त्यांच्याकडे आहेत.
विधान परिषदेच्या नऊ जागा आम्ही महायुतीत शंभर टक्के जिंकू. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे.त्यांना घोडेबाजार करायचा असेल तर ते तिसरा उमेदवार ठेवतील आम्हाला आमच्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री