विधान परिषद होतेय पेपरलेस, सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक

By admin | Published: March 6, 2017 05:39 PM2017-03-06T17:39:52+5:302017-03-06T17:39:52+5:30

देशातील पहिलेवाहिले पेपरलेस सभागृह बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र विधान परिषदेची वाटचाल सुरू झाली आहे

Legislative council is a paperless, touchscreen notebook for members | विधान परिषद होतेय पेपरलेस, सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक

विधान परिषद होतेय पेपरलेस, सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - देशातील पहिलेवाहिले पेपरलेस सभागृह बनण्याच्या दिशेने विधान परिषदेची वाटचाल सुरू झाली आहे. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्यांच्या बाकांवर कामकाजाच्या कागदपत्रांच्या जागी अत्याधुनिक टचस्क्रीन नोटबुक ठेवण्यात आला होता. त्यामुळे विधान परिषद सभागृह भलतेच हायफाय झाल्याची भावना सभासदांमध्ये होती.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले. या नोटबुकमध्ये इंटरनेटची सुविधा असणार असून, विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, नियम पुस्तिका, विधिमंडळाच्या विविध समित्या आणि महामंडळांचे अहवाल, तारांकित आणि अतारांकीत प्रश्नांची यादी, स्वीकृत लक्षवेधी सूचना, सदस्यांचे वेतनभत्ते, आजीमाजी सदस्यांची माहिती आणि सभागृहाचे १९३७ सालापासूनच्या कामकाजाचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले.
पेपरलेस आणि डिजिटल कामाकाजाच्या दिशेने विधान परिषदेने वाटचाल सुरु केल्याबद्दल सर्वपक्षिय सदस्यांनी यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांचे अभिनंदन आणि कौतुुक केले.
पण आता आक्रमकता दाखवायची कशी!

सभागृहात अत्याधुनिक टचसक्रीन नोटबुक आल्याने हायफाय झालेल्या सदस्यांना मात्र भलतीच चिंता सतावत आहे. एरवी आपली आक्रमकता दाखविण्यासाठी कामकाजाशी संबंधित कागदे फाडून फेकण्याची सदस्यांची सवय असते. मात्र आता कागदांची जागा घेतल्याने फाडायचे काय आणि फेकायचे काय, असा भलताच पेच विरोधी बाकांवरील सदस्यांसमोर निर्माण झाला आहे.
फक्त माझ्याकडे काही फेकू नका- सभापती
पेपरलेस सभागृहामुळे सदस्यांची अडचण झाली आहे. कागदपत्रे फाडून आक्रमकता दाखविता येणार नाही. आता तुमच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, आता नोटबुक वगैरे फोडून माझ्यावर टाकू नका म्हणजे झाले, असे सभापतींनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
नोटबुकमधील माहिती मराठीत हवी- दिवाकर रावते
सदस्यांसमोर ठेवण्यात आलेली बहुतांश माहिती ही इंग्रजी भाषेतून आहे. ती तातडीने मराठीतून उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. आपण डिजिटल होतोय हे खरे असले तरी आता सर्व सदस्य या नोटबुकमध्ये आपले डोके खुपसून बसतील. त्यामुळे एकमेकांकडे पाहणे, खाणाखुणा, हातवारे थांबतील. सभागृहाच्या कामकाजातील मौजच निघून जाईल की काय अशी शंका येते, असेही रावते म्हणाले. यावर आजचा हा पहिलाच दिवस आहे. येत्या दोनतीन दिवसात आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी ग्वाही सभापतींनी दिली.

Web Title: Legislative council is a paperless, touchscreen notebook for members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.