विधान परिषद पाच वेळा तहकूब
By admin | Published: April 2, 2015 03:02 AM2015-04-02T03:02:26+5:302015-04-02T03:02:26+5:30
गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव
मुंबई : गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या मागणीवरून बुधवारी विधान परिषदेचे कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब झाले. अखेरीस चर्चेला प्रारंभ झाला तेव्हा विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माणिकराव ठाकरे यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे गृह खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेबाबत विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची व सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. माणिकराव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. ही मागणी स्वीकारण्यास संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विरोध केला. त्यामुळे सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली व सर्वप्रथम २० मिनिटांकरिता कामकाज तहकूब झाले. त्यानंतर चारवेळा दहा मिनिटांकरिता कामकाज तहकूब करण्यात आले.
अखेरीस नियम ९७ अन्वये चर्चेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, नागपूर येथील मध्यवर्ती तुुरुंगातून पाच कैदी पळून गेले ही अत्यंत गंभीर घटना आहे. येथील तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे हे त्यांच्या केबिनमध्ये कैद्यांच्या नातलगांना बोलावून त्यांचे वाढदिवस साजरे करीत होते. नगरमधील कायदा व सुव्यवस्थाही ढासळलेली आहे. एक महिन्यात अॅट्रॉसिटीच्या ३० केसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात जर ही अवस्था असेल तर राज्यात कायद्याचे राज्य आहे हे आपण कसे म्हणणार, असा सवाल मुंडे यांनी केला. निवडणूक प्रचारात राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र त्याला आपण पात्र नाही अशी कबुली आता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी केली तर नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी केली. यावेळी भाई जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड, हेमंत टकले यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)