विधान परिषदेत राणेंना सभापतींनी सुनावले
By admin | Published: July 22, 2016 07:35 PM2016-07-22T19:35:49+5:302016-07-23T18:06:56+5:30
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राणे यांना सुनावले. प्रत्येक औचित्याच्या मुद्याची सरकारकडून दखल घेतली जाते. एक महिन्याच्या आत त्यावर आवश्यक कार्यवाही, उपाययोजना केली जाते.
राणे, शंका घेवू नका - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : विधान परिषदेत दाखल झाल्यापासून काँग्रेस सदस्य नारायण राणे विविध नियमांचा आधार घेत सभापती आणि पिठासीन अधिका-यांची शाळा घेत आहेत. अनेकदा सभागृह कोण चालवितो, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण होते. शुक्रवारी मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी नारायण राणेंना संसदीय आयुधाची महत्ता सांगत धडे दिले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापतींच्या परवानगीने सदस्य औचित्याच्या मुद्याद्वारे विविध विषय मांडत असतात. या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे आणि सरकारने त्यावर आवश्यक कार्यवाही करावी, हा संकेत आहे. सदस्याने औचित्य मांडल्यावर विधिमंडळाच्या परंपरेप्रमाणे परस्पर कृती होत असते. शुक्रवारी मात्र नारायण राणे यांनी सरकारचे लक्ष नसल्याचे सांगत औचित्याच्या मुद्यांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावर, औचित्याचे मुद्दे सदस्यांच्या हातातील प्रभावी आयुध असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राणे यांना सुनावले. प्रत्येक औचित्याच्या मुद्याची सरकारकडून दखल घेतली जाते. एक महिन्याच्या आत त्यावर आवश्यक कार्यवाही, उपाययोजना केली जाते. त्यानंतर त्याचा कार्य अहवालच संबंधित सभागृह सदस्य आणि सभागृह सचिवालायाकडे पोहचविला जातो. औचित्याच्या मुद्यांसंबंधीचे असे अनेक अहवाल मी स्वत: वाचले आहेत. त्यामुळे या आयुधाबाबत आश्वस्त रहा. शंका घेवू नका, असे सभापतींनी राणे यांना सांगितले.