विधान परिषद बिनविरोध
By admin | Published: June 4, 2016 03:45 AM2016-06-04T03:45:26+5:302016-06-04T03:45:26+5:30
भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले
मुंबई : भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मागच्या दाराने का होईना, विधिमंडळात प्रवेश झाला.
परिषदेच्या दहा जागांसाठी बारा अर्ज दाखल झाल्यामुळे घोडेबाजार होणार, अशी अटकळ होती. भाजपाचे पाच जण निवडून येणार असताना पक्षाने सहा उमेदवार दिले, तर भाजपाचेच मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांत खिंडार पाडण्यासाठीच भाजपाने चाल खेळल्याची चर्चा होती. मात्र, ‘निष्ठावंत की उपरे’ या वादामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढता काढता भाजपा नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंह यांच्या उमेदवारीला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. परंतु, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दरेकर आणि उत्तर भारतीयांचे नेते सिंह हे पक्षाला ‘मायलेज’ देऊ शकतात, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांच्या गळी उतरविल्याने अखेर प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी दहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अधिकृत घोषणा १२ जून रोजी करण्यात येईल.
नारायण राणेंच्या ‘एन्ट्री’ने कॉंग्रेसला बळ गेल्या दोन वर्षांत सलग दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नारायण राणे यांचे या निवडणुकीतून विधान परिषदेत आगमन झाल्याने पक्षाचे बळ वाढले असून, सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला, तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून सेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले. हे दोन्ही पराभव
पचवून राणे पुन्हा वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरले; पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही. शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.राणे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. शिवाय, आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते सरकारला सळो की पळो करून सोडू शकतात.
महायुती
सदाभाऊ खोत
विनायक मेटे
प्रवीण दरेकर
आर. एन. सिंह
सुजितसिंह ठाकूर
सुभाष देसाई
दिवाकर रावते
आघाडी
नारायण राणे
रामराजे नाईक निंबाळकर
धनंजय मुंडे