विधान परिषद निवडणूक बिनविरोध, भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:48 AM2018-07-10T06:48:31+5:302018-07-10T06:48:53+5:30
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध झाली.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. या ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. तथापि, भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपाचे भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि नीलय नाईक, शिवसेनेचे अनिल परब, मनिषा कायंदे, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी आणि शेकापचे जयंत पाटील यांचा बिननिवड झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.
विधान परिषदेच्या १६ जुलैला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा व रासपा मिळून सहा उमेदवारी अर्ज दाखल केले होेते. परंतु भाजपाला पाच जागाच निवडायच्या होत्या. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केलेला अर्ज भाजपाला मागे घ्यावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
ही निवडणूक बिनविरोध होत असल्याचा दावा बापट यांनी केला. रासपाचे जानकर यांना भाजपाने पाठिंबा दिल्याने देशमुख यांनी माघार घेतली.
विधान परिषदेचे पक्षीय
बलाबल आता असे असेल
भाजपा २१
काँग्रेस १७
राष्ट्रवादी काँग्रेस १७
शिवसेना १२
लोकभारती (जदयु) ०१
राष्ट्रीय समाज पक्ष ०१
पी. रिपा ०१
शेकाप ०१
अपक्ष ०६
रिक्त ०१
एकूण ७८
अकरा जागा बिनविरोध निवडण्यात आल्याने ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत भाजपा-शिवसेनेचे संख्याबळ ३३ झाले आहे.
यामुळे संख्याबळाच्या जोरावर भाजपा, शिवसेना, मित्रपक्ष व अपक्ष मिळून पुढील अधिवेशनात ते सभापती व उपसभापती पदावर दावा करू
शकतात. सध्या सभापती
व उपसभापती ही पदे अनुक्रमे राष्टÑवादी काँग्रेस
व काँग्रेसकडे आहे.