विधानपरिषद निवडणूक होणार बिनविरोध
By admin | Published: June 3, 2016 03:58 PM2016-06-03T15:58:52+5:302016-06-03T15:58:52+5:30
भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष अर्ज भरणारे भाजपा नेते मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष अर्ज भरणारे भाजपा नेते मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्याने दहा जागांसाठी दहाच उमेदवार राहिले आहेत. 10 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणुकीत कुरघोडी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील ट्विस्ट संपला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार आहे. भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्राम नेते विनायक मेटे, प्रवीण दरेकर, आर एन सिंह आणि सुजीतसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उमेदवारी देण्यात आली होती. हे सर्व उमेदवार आता बिनविरोध निवडले जाणार आहेत.
काँग्रेसने ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. बिनविरोध निवडणूक होणार असल्याने हे सर्व नेते आमदार म्हणून विधानपरिषदेत प्रवेश करणार हे नक्की झालं आहे.
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 जूनला मतदान होणार आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी सहा नावं जाहीर केली होती. प्रसाद लाड हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले होते त्यामुळे ज्यामुळे भाजपामध्ये नाराजी होती. त्यानंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं. प्रसाद लाड यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज कोटक यांनीही अर्ज मागे घेतला.