दिवंगत माजी सदस्यांना विधिमंडळाची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:07 AM2018-02-27T03:07:43+5:302018-02-27T03:07:43+5:30
आपल्या विनयशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने आदराचे स्थान निर्माण करणारे विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, दिलदार स्वभावाचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर आदी दिवंगत सदस्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या विनयशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने आदराचे स्थान निर्माण करणारे विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, दिलदार स्वभावाचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर आदी दिवंगत सदस्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली.
फरांदे हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत आदरणीय असे नेते होते. त्यांची कारकिर्द आणि विधिमंडळातील कामगिरीचा संदर्भ ग्रंथ विधानमंडळाने काढावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडताना केली. सर्व पक्षांमध्ये मैत्र जपणारे डावखरे यांच्या आठवणींना दोन्ही सभागृहांनी उजाळा दिला. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन संबंध जपणारे ते नेते होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली. शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष आणि श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे हे शिर्डीच्या विकासासाठी नेहमीच आग्रही असत, तर अलीकडे निवर्तलेले खासदार चिंतामण वनगा हे पक्षनिष्ठेचे आणि निष्कलंक नेता कसा असावा, याचे आदर्श उदाहरण होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय, हफीज धत्तुरे, कमल देसाई, चंद्रकांत (चंदूकाका) जगताप या माजी सदस्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला, तर विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी शोक संवेदना व्यक्त केली.
अनुशेषाचा अर्थ महाराष्ट्राला समजावून सांगणारा पहिला नेता, असा किंमतकर यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, मागास भागांचा अनुशेष हीच त्यांची जात, धर्म अन् पक्षही होता. अनुशेषाच्या मुद्द्यावर त्यांनी दिलेल्या लढ्यातील मीदेखील एक शिपाई होतो. मला हा विषय त्यांच्यामुळेच कळला. त्यांच्या निधनाने मागास भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.