विधिमंडळ पुन्हा ठप्प

By Admin | Published: March 11, 2017 01:03 AM2017-03-11T01:03:08+5:302017-03-11T01:03:08+5:30

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सर्वपक्षीय सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातल्यानंतर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा एकदा ठप्प झाले.

Legislature jam again | विधिमंडळ पुन्हा ठप्प

विधिमंडळ पुन्हा ठप्प

googlenewsNext

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सर्वपक्षीय सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातल्यानंतर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा एकदा ठप्प झाले. आता पाच दिवसांच्या सुटीनंतर १५ मार्चला अधिवेशन पुन्हा सुरू होईल.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘कर्जमाफीच्या घोषणेशिवाय कामकाज चालू देणार नाही,’ असे सांगितले अन् प्रचंड घोषणाबाजीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. काही सदस्य अध्यक्षांच्या समोर जाऊन घोषणाबाजी करू लागले.
या गदारोळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दुपारी १२पर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. शिवसेनेच्या सदस्यांनी फलक फडकविले. त्यावर काही व्यंगचित्रे आणि कर्जमाफीची मागणी होती.
या गदारोळातच सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीने सभागृहाच्या कामकाजासंदर्भात आजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणारा ठराव त्यांनी मांडला व तो मंजूरही झाला. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तर विधान परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरत सलग दुसऱ्या दिवशी कामकाज रोखून धरले. सकाळी कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. आम्हाला फायदा व्हावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागतो, असा आरोप वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मग, फडणवीस सरकारने केलेल्या सावकारी कर्जमाफीने कुणाला फायदा झाला, विदर्भातले सावकार नेमके कुठल्या पक्षाचे होते, याचाही खुलासा सरकारने करायला हवा, असे तटकरे म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीला विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज काढावे लागू नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. वीजजोडणी, ठिबक सिंचनावर अनुदान, स्वस्त बियाणे, जलयुक्त शिवार अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु, पाटील यांच्या खुलाशाने विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी सुरू केली. हा गदारोळ सुरू असतानाच चंद्रकांत पाटील आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुढचे कामकाज घेण्याची विनंती केली. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. वाढत्या गदारोळामुळे अखेर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (विशेष प्रतिनिधी)

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झालीच नाही
राज्यपालांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर दिलेल्या अभिभाषणावर ८ आणि
९ मार्च रोजी विधानसभेत चर्चा होणार होती. मात्र, गोंधळामुळे ती होऊ शकली नाही. शेवटी या अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे आभार व्यक्त करणारा प्रस्ताव सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज प्रचंड गोंधळातच मांडला आणि तो आवाजी मतदानाने मंजूर झाला.

शिवसेनेकडून धिक्कार
शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात आणि विधान भवन परिसरात फेरी मारून घोषणाबाजी केली. ‘कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणा देत त्यांनी आपल्याच सरकारचा निषेध केला.

Web Title: Legislature jam again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.