मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ दणाणले : उमटले तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:15 AM2017-08-10T04:15:10+5:302017-08-10T04:15:14+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एक ओळीचा ठराव सभागृहाने एकमुखाने करावा, अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये उतरले. चर्चा नको, आरक्षण द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. काही आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चा नको, मराठा आरक्षण द्या, अशी मागणी केली आणि विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. सत्तारूढ आमदारही आरक्षणाची मागणी करीत होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळामुळे दुपारी ३पर्यंत तहकूब करण्यात आले.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मोर्चासंदर्भात निवेदन केल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसून मोर्चेकºयांचे त्यामुळे समाधान झालेले नाही, अशी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
मोर्चा शांततेत, आमदार भिडले
आपल्या मागण्यांसाठी एकीकडे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत निघालेला मराठा क्रांतीचा मूकमोर्चा, तर दुसरीकडे विधान भवनाच्या पायºयांवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार हमरीतुमरीवर उतरून एकमेकांशी भिडल्याचे चित्र विधान भवनाच्या पायºयांवर पाहायला मिळाले.
आपण मराठा समाजाचे कैवारी आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सदस्य अक्षरश: एकमेकांशी भिडले. जोरदार घोषणाबाजी करत या आमदारांनी कुरघोडीचा प्रयत्न चालविल्याने विधान भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विधान भवनातील मार्शल्सना धाव घ्यावी लागली.
विधान परिषदेत धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीका केली. मोर्चाच्या मागण्यांपैकी निम्म्यांनाही सरकारने हात घातलेला नाही. सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची मोर्चेकºयांची भावना झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
सरकारने केलेल्या घोषणांच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रम कधी देणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. अन्य समाजांना आरक्षण देण्याबाबत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी औदार्य दाखवले तसेच आता मराठा समाजाबाबत दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनी सभात्याग केला.
चंद्रकांत पाटील यांनी आरोप फेटाळले
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरण, अॅट्रॉसिटी कायदा या तीन बाबी राज्य सरकारच्या हाती नसल्याचे सांगत त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.