वाशिममध्ये कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: August 18, 2016 12:26 AM2016-08-18T00:26:58+5:302016-08-18T00:26:58+5:30
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजालाड तालुक्यातील शेतक-याने विष घेऊन आत्महत्या केली.
कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १७: सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आसोला खुर्द येथील ५५ वर्षीय शेतकर्याने आत्महत्या केली. शेषराव भिका चव्हाण असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. शेषराव चव्हाण यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मानोरा शाखेचे कर्ज तसेच काही खासगी व हातउसणे कर्ज थकीत होते. गेल्या १0 ते १२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने डोंगराळ भागातील कोरडवाहू शेतीमधील पिकामध्ये उत्पादनात घट येण्याची भीती असल्याने ते नेहमी पत्नीसोबत बोलताना कर्ज कसे फेडायचे याबाबत चिंता व्यक्त करीत होते. या नैराश्यातूनच त्यांनी १६ ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना १७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा आप्त परिवार आहे.