‘आघाडी स्तोत्र’...‘दादा महात्म्य’

By admin | Published: January 28, 2017 01:21 AM2017-01-28T01:21:11+5:302017-01-28T01:21:11+5:30

सुप्रसिद्ध भविष्यकार ‘बाबा महाराज कऱ्हाडकर’ यांचा मुक्काम अलीकडं प्रीतिसंगमावर वाढला होता. कारण दिल्लीची ‘बोचरी’ थंडी सहन होत नसल्यानं

'Leo Soft' ... 'Dada Mahatmya' | ‘आघाडी स्तोत्र’...‘दादा महात्म्य’

‘आघाडी स्तोत्र’...‘दादा महात्म्य’

Next

सुप्रसिद्ध भविष्यकार ‘बाबा महाराज कऱ्हाडकर’ यांचा मुक्काम अलीकडं प्रीतिसंगमावर वाढला होता. कारण दिल्लीची ‘बोचरी’ थंडी सहन होत नसल्यानं त्यांना मराठा मुलूखच अधिक प्रिय वाटत होता.. मात्र, मुंबईही परकी झाल्यानं त्यांनी गावाकडच्या कृष्णा-कोयनेकाठी डेरा टाकला होता. खरं तर हे ‘दिल्ली स्पेशल’ महाराज पाच वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झाले, तेव्हा ‘आम्ही नेत्यांचे भविष्य घडवितो!’ अशी दिमाखदार पाटी म्हणे त्यांच्या आश्रमाबाहेर झळकायची. मात्र, ‘हे महाराज केवळ आपल्यासारख्यांचे भविष्य घडवतच नाहीत, तर बिघडवितातही,’ याचा धक्कादायक साक्षात्कार झाल्यापासून ‘धाकटे दादा बारामतीकरां’ची मती पुरती गुंग झाली होती. असो, बाबांच्या आश्रमात आजही अनेक जण येऊन आपला हात दाखवित होते. भविष्य जाणून घेत होते. त्याचा हा थेट वृत्तांत..
निरुपम : महाऽऽराज मेरा हात देखो.. कुछ अच्छा होगा क्या ?
बाबा महाराज : (भिंगानं हातावरच्या रेषा न्याहाळत) बहोत कुछ अच्छा होगा, पण तुमची शत्रूरेषा ठळक बनत चाललीय. मौन बाळगा. भविष्यात हात चोळत बसण्याची पाळी येऊ नये, म्हणून हातात हात घालून काम करा. रोज ‘गुरू’ची उपासना करा. ‘गुरू’बळ कमी असल्यानंच लवकर ‘काम’ होत नाही तुमचं.
(चेहरा विचित्र करत निरुपम निघून गेले. कोल्हापुरी गाडीतून बंटी आले.)
बंटी : माझा हात बघा महाराजऽऽ कधी संपेल वनवासाचा फेरा?
बाबा महाराज : तुम्ही अज्ञातवासातून बाहेर आलात, हेच खूप समजा. शनी जणू ‘भीमा’सारखा शक्तिवान बनून तुमच्या राशीत ठाण मांडून बसलाय. तो रोज एका घरात प्रवेश करतोय. कधी ‘हात’ दाखवतोय, तर कधी ‘कमळ’ फुलवतोय... तर कधी ‘घड्याळाचा गजर’ वाजवितोय. त्यात कहर म्हणजे ‘चंद्र’ही त्यालाच साथ देतोय. तुमच्या हक्काचे ग्रहही त्याच्याकडेच आकर्षित होताहेत. तेव्हा जरा जपून...
बंटी : (अस्वस्थ होत) मग यावर काय उपाय?
बाबा महाराज : बावड्यातून बाहेर पडून संपूर्ण करवीर नगरीला प्रदक्षिणा घाला. पंचगंगा अन् वारणा खोऱ्यात विखुरलेले तुमचे सारे हिरे-मोती एकत्र करून त्याची ‘हात’भर माळ तयार करा!
(त्यानंतर, अशोकराव नांदेडकर आश्रमात प्रवेशले.)
नांदेडकर : (अनिच्छेनं) खरं तर, तुमचं हे ‘आदर्श’ शास्त्र मला बिलकूल आवडत नाही. मात्र, परिस्थितीमुळं नाईलाजानं तुमच्याकडं आलोय. बघा महाराजऽऽ माझा हात काय म्हणतोय?
बाबा महाराज : (गंभीरपणे हात न्याहाळत) पुन्हा एकदा ‘हातात घड्याळ’ घेण्याचं धाडस तुम्ही दाखवताय खरं, पण विचार करून निर्णय घ्या. सिंचनात बुचकळून निघालेले ‘राहू-केतू’ या क्षणी तुम्हाला छान-छान वाटत असले तरी हेच दोघे भविष्यात त्रासदायक ठरतील.
नांदेडकर : (आत्मविश्वासानं) म्हणूनच मी ‘बारामती’च्या दुकानातून ‘आघाडी स्तोत्र’ अन् ‘दादा महात्म्य’ ही दोन पुस्तकं वाचायला घेतलीत. रोज सकाळ-संध्याकाळ त्यांचंच मन लावून पठण करतोय महाराजऽऽ.
बाबा महाराज : (आश्चर्यानं) पण ‘बारामती’च्या दुकानात तर ‘चव्हाण’ प्रकाशनाच्या पुस्तकांवर बंदी आहे ना... ‘चव्हाण’ नाव ऐकलं, तरी ‘दादां’च्या तळपायाची आग म्हणे थेट मस्तकाला शिरते.
नांदेडकर : (गालातल्या गालात हसत) पण ते ‘चव्हाण’ म्हणजे ‘कऱ्हाडचे तुम्ही’ अन् ‘पिंपरी-चिंचवडच्या ताई’ होऽऽ.. आम्ही नांदेडचे.
- सचिन जवळकोटे

Web Title: 'Leo Soft' ... 'Dada Mahatmya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.