विषारी मांस खाल्ल्याने बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: June 1, 2016 01:12 AM2016-06-01T01:12:18+5:302016-06-01T01:12:18+5:30
बुलडाण्यातील घटना; वनसंरक्षकास नोटीस बजावली.
बुलडाणा : विषारी औषध लावलेल्या मृत बकरीचे मांस खाल्ल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला. बुलडाणा वन विभागात मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत बिबट्याचे सर्व अवयव जसेच्या तसे होते. त्यामुळे तस्करीसाठी शिकारीचा हा प्रकार नसल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बुलडाणा तालुक्यातील माळवंडी शिवारात गट नंबर १९३ मधील सखाराम आश्रू चव्हाण यांच्या शेतात ही मृत बिबट्या आढळला. वनविभागाच्या अधिकार्यांनी त्याचा तातडीने पंचनामा केला. मृत बिबट्याचे वय ३ वर्षे असून, ती मादी जातीची आहे. परिसरातच मृत बकरी आढळली असून, तिच्यावर विष टाकलेले होते. हे विषारी मांस खाल्ल्याने बिबट्याचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुलडाणा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका ज्योतीलवार यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा वनसंरक्षकास नोटीस
बुलडाणा तालुक्यातील करवंड शिवारात काही दिवसांपूर्वी एका अस्वलाने दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते. या घटनेनंतर आरएफओ गणेश झोडे यांनी गावाला भेट दिली नाही. ते नेहमी बाहेर राहत असल्यामुळे ३0 मे रोजी शासकीय कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना शो-कॉज नोटीस देऊन घटनेचा खुलासा मागितला होता. दरम्यान, आज बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.