बिबट्याचा मुक्काम रात्रभर घरातच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:24 PM2017-09-24T23:24:44+5:302017-09-24T23:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : घराबाहेरील अंगणात महिला भांडी घासत असताना बछड्यांसह बिबट्या त्यांच्याशेजारून थेट घरात घुसला. कुटुंबीयांनी दरवाजाला कडीकोयंडा लावून त्याला रात्रभर कोंडले. मात्र, रविवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाºयांसमोरच घराची कौले फोडून बिबट्याने शिवारात धूम ठोकली. चोरमारवाडी-येणपे, ता. कºहाड येथे ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येणपे विभागात गत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी रात्री बिबट्या चोरमारवाडीतील लोकवस्तीत घुसला. चोरमारवाडी येथे बाबासाहेब विठ्ठल चोरमारे हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराशेजारीच हणमंत चोरमारे व महादेव चोरमारे यांचेही घर आहे. रविवारी रात्री बाबाहेब यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी जेवण केले. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सून वनिता ही भांडी धुण्यासाठी अंगणात गेली. त्यावेळी एक बिबट्या व त्याची बछडी वनिताच्या शेजारून घराच्या दिशेने गेली. सुरुवातीला वनिताने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, व्यवस्थित पाहिले असता बिबट्या बछड्यासह घरात गेल्याचे तिला दिसले. त्यामुळे तिने आरडाओरडा केला. यावेळी घरात घुसलेल्या बिबट्याचा पंजा झोपेत असलेल्या हौसाबाई चोरमारे यांच्या हातावर पडला. त्यामुळे त्या जाग्या झाल्या. त्यांनीही बिबट्याला पाहून घराबाहेर धाव घेतली. बाबासाहेब यांनी इतर कुटुंबीयांना जागे करून घरातून बाहेर काढले. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. तसेच याबाबतची माहिती इतर ग्रामस्थांना व उंडाळे पोलिस दूरक्षेत्रात दिली. पोलिसांनी ही माहिती वन विभागाला देऊन घटनास्थळी धाव घेतली.
मध्यरात्री वनविभागाचे अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घराच्या चारही बाजूंनी पाहणी केली. बिबट्याला बाहेर पडता येणार नाही, यासाठी त्यांनी तजवीज केली. तसेच सकाळी सहा वाजता वेगवेगळ्या उपाययोजना करीत बिबट्याला बछड्यासह जेरबंद करण्यासाठी व्यूहरचना आखली. घराची कडी काढून वनाधिकारी व कर्मचारी घरामध्ये गेले. आतील १० खोल्या त्यांनी पिंजून काढल्या. मात्र, त्यांना बिबट्या आढळला नाही. त्यामुळे घरात गेलेला प्राणी बिबट्या नसावा, असा कयास काढण्यात आला. मात्र, घरात बिबट्याच घुसल्याचे चोरमारे कुटुंबीयांनी ठामपणे सांगितले. अखेर वन कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या छतावर जाऊन कौले काढून पाहिली. त्यावेळी माळ्यावर एका कोपºयात बिबट्या बसल्याचे त्यांना दिसले.
अखेर संपूर्ण कौलारू घरावर बिबट्याला पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली. घरावरील कौले काढून बिबट्याला बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश येईल, असे वाटत असतानाच बिबट्याने माळ्यावरून बाहेर उडी मारली. कौलावर पसरलेली जाळीही बिबट्याच्या उडीपुढे कुचकामी ठरली. जाळी तोडून बिबट्या डोंगराच्या दिशेने पसार झाला. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. वनविभागाच्या हाती काहीच उरले नाही. ंंं
बिबट्या पळाला; पण बछडा कुठे गेला?
बिबट्यासह एका बछड्याला घरात जाताना पाहिले होते. तसेच हौसाबाई यांच्या हातावरही बिबट्याचा पंजा पडला होता. चोरमारे कुटुंबातील काहीजणांनी बिबट्या व बछड्याला पाहिले होते. रविवारी सकाळी वनाधिकाºयांसमोरच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर संपूर्ण घर शोधण्यात आले. मात्र, बछडा सापडला नाही. बछडा गेला कुठे? असा प्रश्न चोरमारे कुटुंबीयांसह वनविभागाला पडला आहे.