बिबट्याच्या तावडीतून पोटच्या गोळ्याची सुटका
By admin | Published: October 11, 2015 03:58 AM2015-10-11T03:58:43+5:302015-10-11T03:58:43+5:30
बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एक वर्षाच्या ‘कृष्णा’ला माता-पित्याने जिवाची बाजी लावून मोठ्या धाडसाने वाचविल्याची घटना संगमनेर-अकोले रस्त्यावर कोकणेवाडी
संगमनेर (अहमदनगर) : बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एक वर्षाच्या ‘कृष्णा’ला माता-पित्याने जिवाची बाजी लावून मोठ्या धाडसाने वाचविल्याची घटना संगमनेर-अकोले रस्त्यावर कोकणेवाडी शिवारात घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावातील भाऊसाहेब खताळ हे पत्नी रंजना व एक वर्षाचा मुलगा कृष्णासह गुरुवारी रात्री सुगाव (ता. अकोले) येथून दुचाकीवरून घरी परतत होते. संगमनेर-अकोले रस्त्यावरून जात असताना कोकणेवाडी शिवारात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. बिबट्याने रंजना यांच्या पायाला कडाडून चावा घेतला. बिबट्याच्या हल्ल्याने दुचाकी घसरून खताळ दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्याचवेळी बिबट्या चिमुकल्या कृष्णाच्या दिशेने रोख धरीत त्याच्यावर चाल करून आला असता रंजना यांनी पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावली. त्यांनी कृष्णाला साडीच्या पदरात झाकले, तर भाऊसाहेब यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने शेतात धूम ठोकली. (प्रतिनिधी)
एकाच बिबट्याचे तीन हल्ले
संबंधित घटना घडण्याच्या अगोदर बिबट्याने याच भागात एका दुचाकीवरील तरुणावर हल्ला केला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून तो सुटला. त्यानंतर काही वेळातच झोडगे वस्तीनजीक संगमनेरहून दुचाकीवरून अकोल्याकडे निघालेल्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला करून पुष्पा मेंगाळ यांच्या पायास चावा घेतला. त्यानंतर तिसऱ्यांदा बिबट्याच्या हल्ल्यातून खताळ दाम्पत्य बचावले.
बिबट्याला पकडण्यासाठी उपविभागीय वन अधिकारी मच्छिंद्र गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकणेवाडी शिवारात घटनास्थळाच्या परिसरात वन विभागातर्फे पिंजरा लावण्यात आला आहे.
- बाबासाहेब काळे, वनपाल