राज्यभरात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतावर भीतीचे सावट, ११ निष्पापांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:37 AM2020-12-02T03:37:03+5:302020-12-02T07:27:36+5:30

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० जणांवर हल्ले झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात अनेक जण गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले आहेत.

Leopard poaching across the state; Fear grips the field, 11 innocent victims | राज्यभरात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतावर भीतीचे सावट, ११ निष्पापांचा बळी

राज्यभरात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतावर भीतीचे सावट, ११ निष्पापांचा बळी

Next

मुंबई : नोव्हेंबरमध्ये सुगीचा हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत नाशिक, नगर, पुणे तसेच मराठवाड्यातील बीडसह काही जिल्ह्यांत दबा धरून बसलेल्या बिबट्यांचे शेतातील मानवी वस्तीवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. यंदा नोव्हेंबर महिन्यात राज्यात बिबट्यांचे तब्बल शंभरावर हल्ले झाले. त्यात १० निष्पापांचा जीव गेला. तर लहान मुलांसह महिला, वृद्ध असे शंभरावर जण जखमी झाले आहे. बिबट्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पशुधनही फस्त केले. त्यामुळे चांगला पाऊसपाणी झालेल्या भागात शेताबांधावर बिबट्यांची मोठी दहशत आहे.  

लॉकडाऊनपासून नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वनविभागाच्या वनपरिक्षेत्रांमध्ये बिबट्या -माणसांमध्ये संघर्ष उद‌्भवलेला दिसून येतो. दहा महिन्यांत नाशिक, इगतपुरी या दोन तालुक्यांत एकूण पाच बालके आणि एका वृद्धाचा बिबट्यांच्या हल्ल्यांत बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांप्रमाणे आतापर्यंत वनविभागाने सुमारे दीड कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये दारणा नदीकाठालगतच्या हिंगणवेढे, दोनवाडे,  बाभळेश्वर, सामनगाव, चेहेडी, पळसे या गावांमध्ये सातत्याने बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. इगतपुरी तालुक्यात दीपावलीपासून बिबट्याने धुमाकूळ घालत दोन चिमुकलींचा बळी घेतला. 

सातपुडा पर्वतरांगेत संचार
जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेसह धानवड, चिंचोली, शिरसोली परिसरातील वनक्षेत्रात बिबट्याचा संचार असून गेल्या महिन्यात धानवड शिवारामध्ये एका गाईचा त्याने फडशा पाडला. दोन वर्षांपासून मानवावर हल्ला झालेला नाही. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील म्हसदी, वसमार याच परिसरात बिबट्याचा सर्वाधिक वावर आहे. पशुधनावरच हल्ले झाले आहेत. 

मराठवाड्यात माेठी दहशत, तिघांचा बळी घेऊनही बीडमध्ये हल्ले सुरूच

बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरूर आणि पाटोदा तालुका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत दोन बिबट्यांना (नर-मादी) वनखात्याने पकडले असले तरी प्राणी आणि माणसांवरील हल्ले चालूच असल्यामुळे एकापेक्षा अनेक बिबटे या परिसरात असावेत, असे वन कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ५ नोव्हेंबरला गर्भगिरी डोंगरपट्ट्यात मादी बिबट्या वनविभागाने पकडली. तेव्हापासून तिच्या शोधासाठी सावरगांव मायंबा परिसरातील गर्भगिरी डोंगरात नर बिबट्या डरकाळ्या फोडत होता. जोडीदाराचा विरह सहन होत नसल्याने तो कासावीस झाला होता. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. बिबट्या  डोंगरदऱ्या सोडून शेतापर्यंत आला. 

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० जणांवर हल्ले झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात अनेक जण गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात ४३ तर नोव्हेंबर महिन्यात ६७ हल्ले झाले. पशुधनावर सर्वाधिक हल्ले करत त्यांना बिबट्याने ठार मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे, तर काहींना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे प्रमुख जयरामे गौडा यांनी दिली. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हे बिबट्याप्रवण क्षेत्र आहेत. ऊस शेती आणि अभयारण्य बिबट्याच्या वाढीस पोषक ठरले आहेत. हा परिसर बिबट्याप्रवण क्षेत्र घोषित केला आहे. 

...असे टाळा हल्ले

  • पिल्लांना डिवचू नये
  • उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपू नये 
  • बिबट्या नजरेस पडला तर आरडाओरड न करता घाबरुन न जाता दुसऱ्या वाटेने निसटून जावे
  • घर, गावांचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा
  • शेतीच्या कामांसाठी रात्री जाताना एकटे जाऊ नये तसेच हातात बॅटरी आणि मोबाइल ठेवावा, रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावी
  • लहान मुलांना घराबाहेर संध्याकाळी एकटे सोडू नये
  • ऊसशेतीपासून घरे सुरक्षित अंतरावर असावी 

 

शासकीय मदतीची तरतूद
पीडित कुटुंबातील वारसांना १५ लाखांचे अर्थसाहाय्य केले आहे. दोन दिवसांत पाच लाखांचा धनादेश देण्याची तरतूद आहे. त्यानंतर दहा लाखांची मुदतठेव वारसदारांच्या बँक खात्यात जमा केली जाते. किरकोळ जखमीस २० हजार, गंभीर जखमीस १ लाख २५ हजार तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाखांचे अर्थसाहाय्य.

नाशिकसह अन्य काही जिल्ह्यांत मागील काही महिन्यांत बिबट्यांचे मानवी वस्तीवर हल्ले वाढले आहेत. बिबट्याच्या वाटेत अचानकपणे माणसाचे येणे आणि बचावासाठी बिबट्याकडून हल्ला होणे, असे अपघाती हल्ले घडले आहे. लहान मुले रात्री अंगणात खेळताना बिबट्याला ते एखादे भक्ष्य भासतात अन् त्यामुळे ते हल्ले करतात. रात्री शौचासाठी बाहेर पडणे, हे हल्ला होण्याचे प्रमुख कारण आहे.  - पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक

Web Title: Leopard poaching across the state; Fear grips the field, 11 innocent victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.